शांततेने आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दाबला जातो, तेव्हा संविधान आणि लोकशाही धोक्यात येतात; सोनम वांगचुक प्रकरणावरून खासदार डिंपल यादव संतप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाखचे पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या उपोषणस्थळावरून दिल्ली पोलिसांनी हटवून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कारवाईवर समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका करत ही कारवाई लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप केला आहे.

 

सोनम वांगचुक गेल्या 21 दिवसांपासून जंतर मंतरवर विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण उपोषण करत होते. मात्र, शनिवारी दिल्ली पोलिसांनी त्यांना उपोषणस्थळावरून हटवून वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मैनपुरीच्या समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले, “भाजप म्हणजे देशासाठी एक पांढरा कफन आहे. जेव्हा शांततेने आंदोलन करणाऱ्या नागरिकांचा आवाज दाबला जातो, तेव्हा संविधान आणि लोकशाही दोन्ही धोक्यात येतात. सोनम वांगचुक यांच्यासारख्या व्यक्तीचा आवाज दाबणे म्हणजे देशाच्या आत्म्यालाच दाबण्याचा प्रयत्न आहे.” असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे.

 

याआधीही त्यांनी सामाजिक माध्यमावरील पोस्टमध्ये केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या, “सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने हटवणे ही केवळ प्रशासकीय कारवाई नाही, तर लोकशाही आणि संविधानावर आघात आहे. भाजप सरकार आता शांततापूर्ण आंदोलनदेखील सहन करू शकत नाही. ही हुकूमशाहीची लक्षणे आहेत.” दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर विरोधी पक्षांकडून सातत्याने सरकारवर टीका होत असून, या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांवर पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.