
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यांचे अवयव निकामी होण्याची भीती त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र, ‘मी 20 जुलैपर्यंत जिवंत राहणार आहे. 20 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीचा संसदेवर मोर्चा असून लोकशाहीच्या मंदिरात मी म्हणणे मांडणार’ असल्याचे वांगचुक म्हणाले.
नीट पेपरफुटी, परीक्षांमधील घोटाळ्यांचा निषेध आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे सोनम वांगचुक हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांचे वजन 20 दिवसांमध्ये 9.5 किलोग्रॅमनी घटले आहे. त्यांचा रक्तदाब आणि रक्तशर्करेची पातळीदेखील घटली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असून उपोषण सुरूच राहिल्यास त्यांचे अवयव निकामी होऊ शकतात, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. मात्र, वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे.
वांगचुक म्हणाले की, सरकारच्या प्रतिसादाशिवाय उपोषण मागे घेतल्यास उपोषण मागे घेतल्यास चुकीचा संदेश जाईल. मी कोणत्याही परिस्थितीत 20 जुलैपर्यंत जिवंत राहणार असून कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चामध्ये समर्थकांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वांगचुक यांनी केले.
मोदी सरकारने राजधर्म पाळावा – काँग्रेस
वांगचुक यांची आज काँग्रेसचे नेते खासदार पवन खेरा यांनी जंतर-मंतर येथे भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आपले म्हणणे सरकारने ऐकावे यासाठी कोणी उपोषणाचा मार्ग स्वीकारतो, त्यावेळी सरकारने त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे हाच राजधर्म आहे. मात्र, सध्याचे सरकार असंवेदनशील आहे, अशी टीका त्यांनी केली.
20 जुलैपर्यंत जिवंत राहीन, नंतर भूत बनून येईन!
मी शरीराने कमकुवत झालोय पण मनाने खंबीर आहे. काही झाले तरी 20 जुलैला संसदेवर जाणाऱया मोर्चात मी तुमच्या सोबत असेन. हा मोर्चा यशस्वी झाला नाही तर नंतर मी भूत बनून परत येईन, असा इशारा सोनम वांगचुक यांनी दिला.


























































