
मुलुंड व परिसरातील रुग्णांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात सध्या आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे अग्रवाल रुग्णालयात अद्ययावत सुविधा द्या, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत आज पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयाला भेट घेऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.
किशोरी पेडणेकर यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान रुग्णालयातील विविध विभाग, उपचार व्यवस्था, उपलब्ध वैद्यकीय उपकरणे, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेतला. आरोग्य सुविधांबाबत रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करून नागरिकांना चांगल्या व तत्परतेने आरोग्य सेवा देण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.
रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता वेळेत व गुणवत्तापूर्ण उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येईल, असे आशासनदेखील त्यांनी या वेळी दिले. या वेळी नगरसेविका राजोल पाटील यांच्यासह म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, नगरसेवक सुरेश शिंदे, नगरसेविका दीपमाला बढे, रंजना नेवाळकर, ज्योती राजभोज, प्रियदर्शनी ठाकरे आदी उपस्थित होते.




























































