राम मंदिर के चोरों को, जूते मारो सालों को! शिवसैनिकांच्या रामरक्षा आंदोलनाने उरण दणाणले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरात कोट्यवधी रुपयांची चोरी झाल्याचे उघड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. रामाची तिजोरी लुटणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी आज शिवसैनिकांनी रामरक्षा आंदोलन केले. ‘राम मंदिर के चोरों को, जूते मारो सालों को…’, ‘मूँह मे राम.. बगल मे छुरी, तिजोरीतील पैशांचा हिशोब द्या..’ अशा घोषणांनी उरण शहर दणाणून गेले.

अयोध्येतील तिजोरी लुटल्याच्या निषेधार्थ उरणच्या राम मंदिरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार व जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी हनुमान स्तोत्र व महाआरतीचा गजर करण्यात आला. यावेळी बोलताना मनोहर भोईर यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, हिंदुत्वाच्या नावाखाली राज्य करणारे व स्वतःला चौकीदार समजणारे आता शांत का बसले आहेत?. राम मंदिरातील देणग्यांवर डल्ला मारणाऱ्यांना जनता सोडणार नाही, असे उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांनी सांगितले. यावेळी उपतालुकाप्रमुख संतोष ठाकूर, संघटक बी. एन. डाकी, रूपेश पाटील, भास्कर मोकल, पंचायत समिती सदस्या कविता पाटील, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, नगर परिषद गटनेते अतुल ठाकूर, शहर संघटक मेघा मेस्त्री, नगरसेविका वंदना पवार, युवासेना शहर अधिकारी आशिष गोवारी आदी उपस्थित होते.

रसायनीत महाआरती

रसायनी येथील हनुमान मंदिरात शिवसैनिकांनी महाआरती केली. यावेळी राम नामाच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी विभागप्रमुख मंगेश पाटील, संपर्कप्रमुख अनिल पिंगळे, माजी सरपंच रोशन राऊत, रमेश पाटील, मोहपाडा शहरप्रमुख नीलेश जुनघरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाडमध्ये शिवसेनेची आज महाआरती

महाडमध्ये उद्या रामरक्षा महाआरती आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार असून राम मंदिरात दरोडा टाकणाऱ्यांचा जाहीर निषेध केला जाणार आहे. श्रीराम मंदिरातील दानपेटी चोरीविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेने आंदोलनाचा अग्नी पेटवला आहे. महाडमध्येही चवदार तळ्याळजवळ असलेल्या श्रीराम मंदिरात महाआरती आंदोलन सायंकाळी ४ वाजता होणार आहे. यावेळी जिल्हाप्रमुख नंदू शिर्के, जिल्हा संघटक डॉ. स्वीटी गिरासे तसेच उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, महिला आघाडी यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनात महाडकरदेखील सहभागी होणार आहेत.