
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांची केरळमधील तिरुवनंतपुरम येथील एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाडामुळे अडकले. त्यानंतर अग्निशमन दलाने थरारक बचावकार्य करून सुखरूप सुटका केली. तांत्रिक बिघाडामुळे लिफ्टचा दरवाजा लॉक झाल्याने थरूर सुमारे 15 मिनिटे इतर काही जणांसह लिफ्टमध्ये अडकून पडले होते. शशी थरूर तिरुवनंतपुरम ईस्ट रोटरी क्लबच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये आले होते. कार्यक्रमादरम्यान लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती नियोजित मजल्यापर्यंत पोहोचू शकली नाही आणि तिचा स्वयंचलित दरवाजा लॉक झाला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी तसेच मेकॅनिकने दरवाजा उघडण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही.
सायंकाळी 7.37 वाजता अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आधुनिक हायड्रॉलिक स्प्रेडरचा वापर करून लिफ्टचा जड दरवाजा काही मिनिटांत उघडला. सायंकाळी 7.51 वाजता शशी थरूर आणि इतर सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. असे वृत्त आज तक ने दिले आहे. लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर शशी थरूर हसतमुख दिसले. त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे मनापासून आभार मानत, “तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही उत्कृष्ट काम केले,” असे म्हटले. तसेच यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असता, “आम्ही सर्वजण पूर्णपणे ठीक आहोत,” असे उत्तर त्यांनी दिले.
बचावकार्य करणाऱ्या जवानांच्या तत्परतेचे कौतुक करत थरूर यांनी त्यांना चहाचे आमंत्रणही दिले. मात्र, जवानांनी नम्रपणे नकार देत पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू होणे पसंत केले. नंतर शशी थरूर यांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्या तत्पर आणि व्यावसायिक बचावकार्यासाठी विशेष सन्मानही केला.



























































