मोदी हुकुमशहा असून दिल्ली पोलीस RSS चे गुंड आहेत; मला मारहाण केली, वांगचुक यांना शिवीगाळ करत फरफटत नेलं, दिपकेंचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या 21 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून हटवण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी वांगचुक यांनी उचलून रुग्णालयात नेले. यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी एक व्हिडीओ दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना शिवीगाळ करत फरफटत नेले. नरेंद्र मोदी हुकुमशहा असून दिल्ली पोलीस आरएसएसचे गुंड आहेत. त्यांनी मलाही मारहाण करत नजरकैद ठेवले, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला.

दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतरवरून ताब्यात घेतले आहे. लहान मुलांवरही लाठीचार्ज करण्यात आला आहे. मी मित्राच्या घरी फ्रेश होण्यासाठी गेलो होते, तिथे मला मारहाण करून नजरकैद करण्यात आले. सोनम वांगचुक यांनी ताब्यात घेतल्यानंतर मला सोडले असून जंतर-मंतरवर प्रवेश करू देत नाहीये, असे अभिजीत दिपके यांनी म्हटले.

सकाळी सात वाजता मी फ्रेश होण्यासाठी मित्राच्या घरी गेलो तेव्हा दिल्ली पोलिसांचे गुंड आले आणि सोनम वांगचुक यांना शिवीगाळ करत फरफटत घेऊन गेले. साठ वर्षांचा एक माणूस गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसला होता, त्याला दिल्ली पोलीस फरफटत घेऊन गेले आणि ते कुठे आहेत हे देखील आम्हाला माहिती नाही, असे दिपके यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले.

सोनम वांगचुक यांनी उपोषणस्थळावरून उचलून नेल्याचे कळताच मित्राच्या घरून मी जंतर-मंतरकडे येण्यासाठी निघालो. मात्र पोलिसांनी मला मारहाण केली आणि गेट बंद करून नजरकैद ठेवले. मला मारहाण करण्यात आली, तसेच जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांनाही मारहाण झाली, त्यांचे फोन काढून घेण्यात आले. हे दिल्ली पोलीस नसून आरएसएसचे गुंड आहेत, अशी टीका दिपके यांनी केली.

आज इथे जे घडले ते पाहून या देशात लोकशाही राहिली की नाही असा प्रश्न पडतोय. नरेंद्र मोदी हुकुमशहा असून दिल्ली पोलीस गुंडगिरी करत आहेत. मोदींच्या हुकुमशाहीला देशातील जनतेने उत्तर द्यायला हवे. सर्वांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शांततेत आंदोलन करावे. ही हुकुमशाही आम्ही सहन करणार नाही. ही माणसं नसून जनावरं आहेत, असा हल्लाबोल दिपके यांनी केला. दरम्यान, वांगचुक यांना पोलिसांनी हटवल्यानंतर आता अभिजीत दिपके हे जंतर-मंतर येथे आमरण उपोषणाला बसले आहेत.