
पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात लष्कराच्या ताफ्यावर मोठा हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गुरुवारी मस्तुंग जिल्ह्यात बलुच लिबरेशन आर्मीने या लष्करी ताफ्यावर प्राणघातक हल्ला केला, ज्याला या वर्षातील सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक मानले जात आहे. या हल्ल्यात ४५ पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा BLA ने केला आहे. मात्र पाकिस्तान सरकार किंवा लष्कराने अद्याप कोणत्याही जीवितहानीच्या आकड्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. लाईव्ह हिंदुस्थानने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केवळ एवढेच मान्य केले आहे की, लष्कराच्या ताफ्यावर हल्ला झाला असून त्यानंतर मोठ्या प्रमाणावर मदत आणि सुरक्षा मोहीम सुरू करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथील अनेक प्रमुख रुग्णालयांमध्ये मेडिकल इमर्जन्सीघोषित करण्यात आली आहे. सिव्हिल हॉस्पिटल क्वेटा, गौस बक्ष रायसानी मेमोरियल हॉस्पिटल आणि आजूबाजूच्या इतर वैद्यकीय केंद्रांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मस्तुंग येथून जखमी सैनिकांना रुग्णवाहिकांमधून रुग्णालयात हलवण्यात आले असून, हेलिकॉप्टर गनशिपच्या मदतीनेही बचावकार्य आणि तैनात जवानांना मदत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
वृत्तानुसार, हा लष्करी ताफा सुमारे १० बसेसमधून प्रवास करत असलेल्या आणि सुट्टीवर जाणाऱ्या सैनिकांचा होता. BLA ने म्हटले आहे की, त्यांचे लक्ष्य हाच लष्करी ताफा होता आणि या हल्ल्यादरम्यान अतिरिक्त सुरक्षा दलांनाही लक्ष्य करण्यात आले. या घटनेनंतर बचाव आणि शोध मोहीम राबवण्यासाठी क्वेटा-कराची राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अनेक ठिकाणी थांबवण्यात आली. संपूर्ण परिसरात सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू केले असून अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत.




























































