
देशभर गाजत असलेल्या नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज नांदेड शहरात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेचे आंदोलन करण्यात आले. नांदेड दक्षिणचे महानगरप्रमुख मनोज यादव यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दुपारी ४ वाजता हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून त्यानंतर पुतळ्याचे दहन करण्यात आले. नीट पेपर लीक प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप करत केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, नांदेड दक्षिणचे महानगरप्रमुख मनोज यादव बोलताना म्हणाले की, नीट परीक्षा प्रक्रियेवर विद्यार्थी व पालकांचा विश्वास डळमळीत झाला असून, या संपूर्ण प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
या आंदोलनात नांदेड दक्षिणचे महानगरप्रमुख मनोज यादव, नंदू वैद्य, भाया रामजी शर्मा, अंकुर पटेल,राजू यादव, सोनू नवघरे, गणेश शिंदे, अमजद लाला, किशोर ठाकूर, अशोक वाघमारे, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महानगरच्या वतीने देण्यात आला.






























































