आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडाने शेतात यशस्वी पेरणी, मंडणगड माहु गावातील दिनकर हुंबरे यांचा एसआरटी शेतीचा प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनवाढ साध्य करण्यासाठी मंडणगड तालुक्यातील म्हारवडा नजीक रानपाल येथे माहू गावातील प्रगतिशील शेतकरी दिनकर लक्ष्मण हुंबरे यांनी सगुणा राईस तंत्रज्ञान पद्धतीचा अवलंब करत आपल्या शेतात दीड एकरवर एसआरटीचा पहिलाच प्रयोग केला आहे. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर, नियोजनबद्ध मशागत आणि वैज्ञानिक शेतीच्या माध्यमातून त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

मंडणगड तालुक्यातील दिनकर हुंबरे यांची भात शेती भारजा नदीच्या लगतच असल्याने तेथे पाण्याची उपलब्धता असते त्यामुळे ते बारमाही शेती करतात. पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक शेती तंत्रज्ञान स्वीकारण्यावर त्यांचा अधिक भर असतो. यावर्षी त्यांनी प्रथमच एसआरटी (सगुणा राईस टेक्नॉलॉजी) पद्धतीने भात लागवडीचा निर्णय घेतला. या पद्धतीसाठी सर्वप्रथम शेतात नियोजनबद्ध वाफे तयार करण्यात आले. त्यानंतर 30 मे रोजी संपूर्ण कुटुंबाच्या सहभागातून दीड एकर क्षेत्रावर रत्नागिरी-8 या सुधारित भात बियाण्याची पेरणी करण्यात आली.

पेरणीनंतर पहिल्या पावसात उगवणाऱ्या गोल गवतासह तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तणनाशकाची फवारणी करण्यात आली. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात पिकाची वाढ अधिक जोमाने होण्यास मदत झाली. सध्या शेतात खत व्यवस्थापनाचे काम सुरू असून पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर वैज्ञानिक पद्धतीने नियोजन केले जात आहे. एसआरटी पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहणे, पाण्याची बचत होणे, मशागतीचा खर्च कमी होणे आणि उत्पादनात वाढ होणे अपेक्षित असल्याचे दिनकर हुंबरे यांनी सांगितले.
शेतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करण्याची वृत्ती आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर यामुळे परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेट देऊन एसआरटी पद्धतीची माहिती घेत आहेत. या प्रयोगाला यश मिळाल्यास मनुष्यबळाची कमतरता, असणाऱ्या तालुक्यातील भातशेतीसाठी ही पद्धत दिशादर्शक ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेतीमध्ये काळानुरूप बदल स्वीकारणे ही आजची गरज आहे. उत्पादन खर्च कमी करून अधिक दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी मी प्रथमच सगुणा राईस तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. आधुनिक यंत्रसामग्री, शास्त्रशुद्ध नियोजन आणि योग्य व्यवस्थापनाच्या बळावर हा प्रयोग यशस्वी होईल, असा विश्वास आहे. या प्रयोगातून परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही आधुनिक शेतीची प्रेरणा मिळावी, हीच अपेक्षा आहे, असे शेतकरी दिनकर हुंबरे यांनी सांगितले.