रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची सायकल वारी सुफळ संपूर्ण, 30 सायकलस्वारांचा सहभाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सलग तिसऱ्या वर्षी आयोजित रत्नागिरी ते पंढरपूर सायकलवारी सुफळ संपूर्ण झाली. रत्नागिरीतील श्री विठ्ठल मंदिर येथून सुरू झालेली ही वारी पंढरपूरला विठुरायाच्या चरणी वंदन करून समाप्त झाली. वारीत क्लबच्या 30 हून अधिक सायकलपटूंनी भाग घेतला तर कुटुंबातील 20 सदस्यांनीही या वारीत भाग घेऊन भक्ती शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.

पहिल्या दिवशी वारीचा मुक्काम उंब्रज (भोसलेवाडी) येथे झाला. दुसऱ्या दिवशी उंब्रज ते पंढरपूर हा प्रवास करण्यात आला. शेनवडी येथील घोडके कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी सायकल वारकऱ्यांसाठी दुसऱ्या दिवशी धपाटे, दही, उसळ, ठेचा असा खात बेत ठेवला होता. संध्याकाळी पंढरपुरात पोहोचल्यावर विठुरायाचे मुखदर्शन घेतल्यानंतर सर्व सायकल वारकरी धन्य झाले. त्याच दिवशी संध्याकाळी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सदस्य गायिका सौ. मुग्धा भट-सामंत यांनी गायनसेवा सादर केली. या दरम्यान 90 दिवसांच्या सायकलिंग चॅलेंजमध्ये यशस्वी झाल्याबद्दल रत्नागिरी सायकलिस्ट क्लब व सदस्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रभरातून आलेल्या चार हजारांहून अधिक सायकल वारकऱ्यांनी गोल रिंगण केले. हा सोहळा अतिशय अविस्मरणीय झाला.

वारीचा अनुभव सांगताना योगेश सामंत म्हणाले की, हातखंब्यापर्यंत आम्हाला निरोप देण्यासाठी आलेल्या सर्व सायकलिस्ट मित्रांनी या वारीत वेगळेच चैतन्य निर्माण केले. मनात एकच ध्यास होता पांडुरंगाच्या भेटीचा! वाटेत एका शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांनी केलेले स्वागत मनाला स्पर्शून गेले. पुढे घरच्यांसारखे केलेले आदरातिथ्य अविस्मरणीय. विठुरायाच्या नगरीत प्रवेश करताना शरीराचा सर्व थकवा क्षणात विरून गेला. विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी माथा टेकला आणि मन भरून आले. वारी संपली तरी मनातील विठ्ठलभक्तीची वारी मात्र अखंड सुरूच राहणार आहे.

सायकलिस्ट क्लबचे वारकरी

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, उपाध्यक्ष दर्शन जाधव, खजिनदार योगेश मोरे, कार्यकारिणी सदस्य प्रसाद देवस्थळी, विशाल भोसले, ओंकार फडके, तसेच योगेश सामंत, प्रसाद खेडेकर, राकेश होरंबे, वरद चुनेकर, अमित पोटफोडे, अक्षय पोटफोडे, विकास कांबळे, नारायण पाटोळे, गजानन भातडे, ज्ञानेश्वर पांडे, मृणाल वाडेकर, पूजा कोसुंबकर, विनायक पावसकर, किरण चुंबाळकर, अमित जोशी, तृणाल येरूणकर, निलेश शाह, मंगेश शिंदे, राहुल भोसले, अथर्व शेंड्ये, संतोष तावडे, विनायक कुऱ्हाडे, तेजस ढवळे आणि ॲड. सचिन नाचणकर. या वारीत 17 वर्षांची पूजा कोसुंबकर व 74 वर्षांचे गजानन भातडे यांनीही सहभाग घेत वारी यशस्वी केली.