सामना अग्रलेख – म्हणे अहवाल अमान्य! किती ढोंग करणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंबूरच्या दुर्घटनेवर फिदीफिदी हसणारे भाजपचे मुंबई अध्यक्ष आज ‘‘या अहवालाला आम्ही केराची टोपली दाखवतो’’ अशी नौटंकी करीत आहेत. महापौर मॅडम या दुर्घटनेतील दुर्दैवी चिमुरड्याच्या नावाने नक्राश्रू ढाळत आहेत. शब्दांचे बुडबुडे सोडत आहेत. सत्ता तुमची, अधिकार तुमचे. करा गुन्हा दाखल, ठरवा संबंधित अधिकाऱ्यांना दोषी! किती ढोंग करणार आहात? अर्थात, राममंदिर दानपेटी घोटाळ्यावर फक्त खेदव्यक्त करणारे लोक केंद्रात आणि भ्रष्टाचाराविरोधात बोलणाऱ्या विरोधकांना धमकी देणारे मुख्यमंत्री राज्यात असल्यावर मुंबई महापालिकेतील त्यांच्याच महापौर दुसरे काय करणार? केंद्रापासून महापालिकांपर्यंत दुर्दैवाने सध्या याच बनचुक्यांचे राज्य सुरू आहे.

मुंबई महापालिकेत गाजावाजा करीत सत्तेत बसलेल्या भाजपवाल्यांचे पितळ पहिल्याच पावसाने उघडे पाडले होते. आता या पावसात झालेल्या दुर्घटनांबाबतच्या कारवाईवरूनही या मंडळींचा बुरखा फाटला आहे. चेंबूर येथे 30 जून रोजी एक झाड शालेय बसवर कोसळून एका चिमुरड्याला जीव गमवावा लागला होता. त्या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या समितीने आपल्या अहवालात पालिकेचे संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना सरळ सरळ ‘क्लीन चिट’ दिली. तसेच कंत्राटदार आणि सल्लागारांना मिळून फक्त सात लाखांचा दंड ठोठावण्याची शिफारस केली. त्यावरून गदारोळ उठल्यावर मुंबईच्या महापौरबाईंना जाग आली. त्यांनी हा अहवाल आपल्याला अमान्य असल्याचा कांगावा केला आहे. मुंबईमध्ये यंदाच्या पावसात झाडे कोसळण्याच्या असंख्य दुर्घटना झाल्या. त्यांना काँक्रिटीकरण हे मुख्य कारण असल्याचे आरोप झाले. त्यात तथ्यदेखील आहे. अर्थात हे कारण मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी फेटाळून लावले होते, तर भाजपच्या महापौर आणि इतर मंडळींनी काँक्रिटीकरणाकडेच बोट दाखविले होते. आता चेंबूरच्या झाड दुर्घटनेच्या चौकशी अहवालावरूनही ही मंडळी अशीच बनवाबनवी करीत आहेत. आयुक्त नेमणारे तुम्हीच, महापालिकेत सत्ता राबविणारे तुम्हीच, चेंबूर दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी

समिती नेमणारेही तुम्हीच

आणि या समितीच्या अहवालावरून वादंग उठल्यावर तो अहवाल नाकारण्याची नौटंकी करणारेदेखील तुम्हीच! मुंबईकर जनतेच्या डोळ्यांत किती धूळफेक करणार आहात? मुळात या समितीत नियुक्त केलेल्या काही सदस्यांना विरोधकांनी आक्षेप घेतला होता. ज्या अधिकाऱ्याकडे काँक्रिटीकरणाची जबाबदारी होती त्यालाच या चौकशी समितीत नेमण्यात आले होते. अशी समिती निरपेक्ष अहवाल देण्याची शक्यता नव्हतीच. किंबहुना, ‘हवा तसा अहवाल’ मिळावा यासाठीच हे सगळे केले गेले असावे. कारण या समितीने उद्यान तसेच रस्ते विभागाला थेट ‘निर्दोष’ ठरवले आणि कंत्राटदार-सल्लागाराला फक्त सात लाख रुपये दंड ठोठावून ‘दोषमुक्त’ केले. महापौर रितू तावडे आता हा अहवाल अमान्य असल्याची सारवासारव करीत असल्या तरी ‘‘मी मारल्यासारखे करते, तू लागल्यासारखे कर’’ असाच हा प्रकार आहे. सत्ताधारी, भ्रष्ट प्रशासन आणि ठेकेदार यांच्यामुळेच मुंबईत कुठे झाड कोसळून चिमुरड्यांचे जीव जात आहेत, तर कुठे महापौरांसमोरच उघड्या मॅनहोलमध्ये माणसे पडत आहेत.  महापालिकेच्या आयुक्त मॅडम म्हणतात, झाड कोसळण्यास काँक्रिटीकरण जबाबदार नाही, पण महापौर मॅडम मात्र वाढत्या काँक्रिटीकरणामुळेच झाडे उन्मळून पडत आहेत, असा ठपका ठेवतात. आयुक्त म्हणतात, ज्या ठेकेदारांनी

नालेसफाईची कामे

नीट केली नाहीत आणि त्यामुळे लोकांना जीव गमवावे लागले त्या ठेकेदारांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करा. महापौर म्हणतात की, चेंबूर दुर्घटनेचा चौकशी अहवाल आणि कंत्राटदाराला फक्त सात लाखांचा दंड आपल्याला अमान्य आहे. त्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा. महापौर ही बनवाबनवी कशासाठी करीत आहेत? तोंडपाटीलकी करण्यापेक्षा दोषींविरोधात थेट कृती करा. तुमचे आणि तुमच्या वरच्यांचे हात कारवाईसाठी का थरथरत आहेत? चेंबूरच्या दुर्घटनेवर फिदीफिदी हसणारे भाजपचे मुंबई अध्यक्ष आज ‘‘या अहवालाला आम्ही केराची टोपली दाखवतो’’ अशी नौटंकी करीत आहेत. महापौर मॅडम या दुर्घटनेतील दुर्दैवी चिमुरड्याच्या नावाने नक्राश्रू ढाळत आहेत. शब्दांचे बुडबुडे सोडत आहेत. सत्ता तुमची, अधिकार तुमचे. करा गुन्हा दाखल, ठरवा संबंधित अधिकाऱ्यांना दोषी! किती ढोंग करणार आहात? अर्थात, राममंदिर दानपेटी घोटाळ्यावर फक्त ‘खेद’ व्यक्त करणारे लोक केंद्रात आणि भ्रष्टाचाराविरोधात बोलणाऱ्या विरोधकांना ‘बघून घेईन’ची धमकी देणारे मुख्यमंत्री राज्यात असल्यावर मुंबई महापालिकेतील त्यांच्याच महापौर दुसरे काय करणार? केंद्रापासून महापालिकांपर्यंत दुर्दैवाने सध्या याच बनचुक्यांचे राज्य सुरू आहे.