
हिंदुस्थानच्या पी. व्ही. सिंधूने जपान ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेत दमदार सुरुवात करत प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला आहे. मलेशियाच्या वाँग लिंग चिंग हिचा 21-14, 21-11 असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवत सिंधूने दुसऱया फेरीत प्रवेश केला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच सिंधूने आक्रमक खेळाची धार कायम ठेवली. तिने पहिल्या गेमच्या मध्यंतराला 11-6 अशी आघाडी घेतली. त्यानंतर वाँगला सावरण्याची संधीच न देता सिंधूने पहिला गेम 21-14 असा सहज जिंकला.
दुसऱया गेममध्येही हिंदुस्थानी स्टारचा दबदबा कायम राहिला. सुरुवातीलाच 8-2 अशी आघाडी घेतल्यानंतर मध्यंतराला तिने 11-3 अशी आघाडी आणखी भक्कम केली. त्यानंतर सलग गुणांची कमाई करत सिंधूने 21-11 असा गेम आणि सामना आपल्या नावावर केला.































































