पोलीस डायरी – राज्यकर्त्यांना जळजळीत सवाल! गुंडांचा मार खाण्यासाठी डॉक्टर बनायचे का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<<प्रभाकर पवार>>
[email protected]

सोमवार भगवान शंकराचा आत्मशुद्धीचा वार। अशा या शांतीच्या दिवशी (६ जुलै) वयाची सत्तरी पार पडलेल्या रमेश सुकऱ्या म्हात्रे या शिंदे गटाच्या पित्त खवळलेल्या नगरसेवकाने व त्याच्या साथीदारांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात घुसून तेथील डॉक्टर व परिचारिकांवर हल्ला केला तेव्हा रात्रीचे ८ वाजले होते.

नवजात बालकाच्या काळजीसाठी असलेल्या एनआयसीयू या अतिदक्षता विभागात एका महिलेला बेड न मिळाल्याने संतापलेल्या रमेश सुकऱ्या म्हात्रे व त्याचे साथीदार रमेश लक्ष्मण पवार (५०), प्रमोद ऊर्फ प्रकाश उद्धव निकम (३५), अक्षय शरद कारंडे (३०) या आरोपींनी डॉ. वैभव नामदेव साळुंके (२६) व डॉ. सृष्टी महेंद्र बावीसकर (२८) यांच्यावर डोंबिवली (प.) येथील शास्त्रीनगर रुग्णालयात हल्ला केला.

विष्णुनगर पोलिसांनी डॉक्टरांवरील हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून नगरसेवक म्हात्रे व त्याच्या साथीदारांना दोन दिवसांनी अटक केली.

डॉक्टर म्हणजे रुग्णांचे प्राण वाचविणारा देवदूतच असतो. सणवार, कुटुंब न बघता तो रात्रंदिवस रुग्णांची सेवा करीत असतो. देव मंदिरात असतो तसा डॉक्टर नावाचा देव रुग्णालयात असतो. अशा देवांवर हल्ला करणाऱ्या रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्यासारख्या हैवानांना काय म्हणावे? रमेश म्हात्रे व त्याचे साथीदार आपल्या शारीरिक बळाचा, ताकदीचा कमजोर डॉक्टरांवर ज्या पद्धतीने वापर करीत होते, मारहाण करून त्यांना अपमानित करीत होते तो व्हिडीओ पाहिल्यावर कुणाचेही रक्त उसळल्याशिवाय राहणार नाही. सत्ता मिळाल्यावर म्हात्रेसारख्या अनाडी लोकप्रतिनिधीने इतके माजावे? आपल्या मुलांच्या वयाच्या डॉक्टरांवर रमेश म्हात्रे व त्याचे साथीदार हल्ला करीत होते तेव्हा जवळच्या परिचारिका म्हात्रेचे ‘शौर्य’ पाहून ढसाढसा रडत होत्या.

मध्यंतरी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पोटाच्या विकारावर उपचार करण्यासाठी दाखल झालेल्या ४५ वर्षीय झायदा या महिलेचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला. या महिलेच्या नातेवाईकांना याची कल्पना देत असताना डॉ. आतिश पारीख व डॉ. शाल्मली धर्माधिकारी यांच्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी अचानक हल्ला केला. त्यात डॉ. पारीख यांच्या दातांच्या जबड्याचे हाड मोडले, तर अन्य दोघांना गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी मारहाणीच्या निषेधार्थ चार दिवस संप पुकारला होता. सरकारने मध्यस्थी केल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला. त्यानंतरही डॉक्टरांवरील हल्ले काही थांबलेले नाहीत. उलट ते वाढले आहेत. हे रमेश सुकऱ्या म्हात्रेच्या निर्दयी हल्ल्यानंतर दिसून येत आहे.

एमबीबीएस डॉक्टर व्हायला बुद्धी, मेहनत, चिकाटी लागते. रात्रभर जागून शरीरशाखाचा अभ्यास करावा लागतो, एमबीबीएस व्हायला ५.५ वर्षे लागतात. त्यानंतर सक्तीची इंटर्नशिप असते. वैद्यकीय क्षेत्राचा ७ ते ८ वर्षांचा अनुभव असलेला डॉक्टर हा रुग्णांशी संयमाने, प्रेमाने बोलत असतो. तसे त्यांना ट्रेनिंग’मध्ये शिकविले जाते. नवजात बालकाला एनआयसीयू विभागात ‘बेड’ नसल्याने गर्भवती महिलेला अॅडमिट करून घेता येणार नाही. तितक्या सुविधा नाहीत. बाळाचे बरे-वाईट होऊ शकते. तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा एवढेच शास्त्रीनगरच्या डॉक्टरांनी बाळाच्या नातेवाईकांना सांगितले होते. त्याचा बागुलबुवा करून रमेश सुकऱ्या म्हात्रे या सत्ताधारी नगरसेवकाने रुग्णालयात लज्जास्पद वर्तन केले. डॉक्टर महिलेच्या अंगावर तो चाल करून गेला. अशा नगरसेवकाविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम व महाराष्ट्र वैद्यकीय सेवा अधिनियमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या कुचकामी भारतीय न्यायसंहिता (BNS) कलमांचा काही परिणाम होणार नाही. त्याच्यावर ‘मोक्का’ सारखी कठोर कारवाईच हवी.

वास्तविक वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या नगरसेवकांना किंवा प्रतिनिधींना अपात्र ठरविले पाहिजे. बीएनएस कायदे कड़क केले पाहिजेत, तरच डॉक्टरांवर हल्ला करण्याचे कुणी धाडस करणार नाही. रमेश सुकऱ्या म्हात्रे याने शाखीनगर रुग्णालयातील एकट्या डॉक्टरांवर हल्ला केला नाही, तर त्याने सर्व शासकीय आरोग्य सेवेवर केला आहे एवढे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे. येथून पुढे डॉक्टरांवरील हल्ले सुरूच राहिले तर उद्या कुणीही सरकारवर, राज्यकर्त्यांवर विश्वास ठेवणार नाही.

हल्ला होऊन दहा दिवस लोटले तरी डॉ. वैभव साळुंके व डॉ. सृष्टी बावीसकर सावरलेले नाहीत. ज्या रुग्णालयात जिवाला धोका आहे. कधी हल्ला होईल याची खात्री नाही, सुरक्षा नाही अशा ठिकाणी आम्ही काम करणार नाही असे कारण देऊन डॉ. वैभव साळुंके व डॉ. सृष्टी बावीसकर यांनी आपल्या सेवेचा राजीनामा दिला आहे. आम्ही आता पुन्हा शासकीय रुग्णालयात परतणार नाही, असेही त्यांनी उद्विग्नपणे स्पष्ट केले आहे. डॉ. सृष्टी बावीसकरचे आई-वडील म्हणतात. “आमची मुलं गुंडांकडून मार खाण्यासाठी आम्ही डॉक्टर केलेली नाहीत.” सृष्टीच्या आई-वडिलांची ही धगधगीत प्रतिक्रिया ऐकूनही राज्यकर्त्यांना पाझर फुटलेला नाही. तो नगरसेवक अद्यापही पक्षात आहे. पक्षाने त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. हा निर्लज्जपणाचा कळस म्हणावा नाही, तर काय म्हणावे?

जनतेतून निवडून येणाऱ्या बहुसंख्य लोकप्रतिनिधींची गुन्हेगारी प्रवृत्ती अलीकडे झपाट्याने वाढत आहे. पूर्वी लोकप्रतिनिधींवर राजकीय गुन्हे दाखल व्हायचे, परंतु अलीकडे खून, बलात्कार, खंडणी, अपहरण, लैंगिक शोषण, मारहाण आदी प्रकारचे गंभीर गुन्हे लोकप्रतिनिधींवर दाखल होत आहेत. २०१९-२०२४ निवडणुकांदरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या विश्लेषणानुसार २२५ खासदारांवर गुन्हे रजिस्टर आहेत. त्यात काहींवर खुनाचे, तर काहींवर बलात्काराचेही गुन्हे दाखल आहेत. तेव्हा लोकांचे प्राण वाचविणारे डॉक्टर्स रुग्णालय सोडून जाणार नाहीत तर काय करणार?