
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस पाटलावरच भररस्त्यात लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सुधागडमध्ये घडली आहे. जुन्या वादातून नेरे गावचे पोलीस पाटील चंद्रकांत पोकळे यांच्यावर हा हल्ला झाला. याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून खाकीचा वचक संपला की काय, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
रायगड जिल्ह्यातील नेरे गावचे पोलीस पाटील चंद्रकांत पोकळे (४२) हे नेरे गावच्या आठजणांवर गुन्हा दाखल बसथांब्याजवळ उभे होते.
त्यावेळी पूर्वी दाखल केलेल्या एका तक्रारीचा राग मनात धरून तीन मोटरसायकलींवरून आलेल्या तरुणांनी त्यांना घेरले. अनिकेत पाठारे याने हातातील लोखंडी रॉडने पोकळे यांच्या कपाळावर व हातावर जोरदार हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच झटापटीदरम्यान त्यांच्या खिशातील सुमारे साडेपाच हजार रुपयेही खाली पडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोकळे यांच्यावर अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाली पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.






























































