गौरी हिंदू नाही, ख्रिश्चन आहे; लव्ह जिहादच्या आरोपांवर अखेर आमिर खान स्पष्टच बोलला…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने व्यावसायिक गौरी स्प्रॅटसोबत केलेल्या तिसऱ्या लग्नानंतर सुरू झालेल्या वादावर अखेर भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या लग्नावरून काही हिंदू संघटनांनी ‘लव्ह जिहाद’चे आरोप केले असून सोशल मीडियावरही त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आमिरने पहिल्यांदाच सार्वजनिकपणे प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत बोलताना आमिर म्हणाला, “आमचे कुटुंब नेहमीच सर्वसमावेशक राहिले आहे. माझ्या दोन्ही बहिणींनी हिंदू पुरुषांशी लग्न केले आहे. माझ्या मुलीचंही लग्न एका हिंदू तरुणाशी झालं आहे. माझा चुलत भाऊ मन्सूरने एका ख्रिश्चन महिलेशी विवाह केला आहे.”

 

गौरी स्प्रॅटबाबत बोलताना त्याने स्पष्ट केले की, “गौरी हिंदू नाही, ती ख्रिश्चन आहे. रीना दत्ता, किरण राव किंवा गौरी—यांपैकी कुणीही माझ्याशी लग्न करताना धर्मांतर केलेले नाही. आमचे विवाह हे सिव्हिल मॅरेज आहेत.” आमिरने पुढे सांगितले की, गौरी ख्रिश्चन कुटुंबातून आली असली तरी ती धर्माचे कठोर पालन करत नाही. “काळ जसजसा पुढे जातो, तसतसं आयुष्य अधिक सुंदर आणि आनंददायी होत आहे,” असेही तो म्हणाला. असे वृत्त आज तक ने दिले आहे.

 

दरम्यान, आमिरच्या तिसऱ्या लग्नानंतर काही राजकीय नेते आणि हिंदू संघटनांनी त्याच्यावर टीका केली होती. सोशल मीडियावरही त्याला ट्रोल करण्यात आले. मात्र या सर्व वादावर आमिरने प्रथमच सविस्तर स्पष्टीकरण देत आपल्या कुटुंबातील आंतरधर्मीय विवाहांची उदाहरणे दिली. याच मुलाखतीत त्याने मुंबईतील पाली हिल येथील कथित 100 कोटी रुपयांच्या स्कायव्हिलाबाबतही स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला की, त्यांच्या गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचा सर्व सदस्यांच्या संमतीने पुनर्विकास सुरू असून, तो कोणताही वैयक्तिक प्रकल्प नाही.

आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्ता यांच्याशी झाले होते, त्यांच्यापासून त्याला जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. त्यानंतर त्याने किरण राव यांच्याशी विवाह केला, ज्यांच्यापासून त्याला आझाद हा मुलगा आहे. अलीकडेच त्याने व्यावसायिक गौरी स्प्रॅटसोबत विवाह केला असून, गौरीला तिच्या पहिल्या लग्नापासून एक 7 वर्षांचा मुलगा आहे.