IND vs ENG – हिंदुस्थानच्या विजयात अक्षर चमकला; पहिल्या वन डेमध्ये इंग्लंडवर मात, शुभमनची दमदार खेळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अष्टपैलू खेळाडू सामना कसा फिरवू शकतो, याचा उत्तम वस्तुपाठ अक्षर पटेलने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात दाखवून दिला. अक्षरने चार विकेट्स घेत यजमानांना हादरे दिले होते. त्यानंतर निर्णयक क्षणी अर्धशतक झळकावत त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अक्षरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे हिंदुस्थानने पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडवर सहा विकेट्स राखून सहज विजय मिळवला. हिंदुस्थानने इंग्लंडला 258 धावांत रोखले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गिल 80 धावांवर जायबंदी झाला. पण त्यानंतर अक्षरने संघाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.

इंग्लंडच्या 259 धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात आश्वासक झाली नाही. रोहित 11 तर विराट 5 धावांवर बाद झाला. हिंदुस्थानची 2 बाद 48 अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर गिलने श्रेयस अय्यरला साथीला घेत तिसऱया विकेटसाठी 101 धावांची भागीदारी रचली. गिलने अर्धशतक झळकावले आणि तो शतकाच्या दिशेने वाटचाल करायला लागला. पण 80 धावांवर खेळत असताना त्याचे स्नायू ताणले गेले आणि त्याने मैदान सोडले. आपल्या या खेळीत गिलने 11 चौकार आणि एक षटकार लगावला होता. गिल तंबूत परतल्यावर श्रेयस अय्यरने धावचीत होत आत्मघात केला. त्यानंतर के. एल. राहुल फक्त एका धावेवर बाद झाला आणि संघ अडचणीत सापडला होता. पण संघाला या अडचणीमधून वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर यांनी बाहेर काढले. अक्षरने यावेळी 52 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकारांसह 57 धावांची मॅचविनिंग खेळी साकारली. अक्षरला यावेळी वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 52 धावा करत सुयोग्य साथ दिली.

तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंपून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि सुरुवातीला सावध खेळ केला. मात्र गुरनूर बरारने तिसऱया षटकात जेकब बेथेल (14) आणि बेन डकेट (43) यांना माघारी धाडले. त्यानंतर जसप्रीत बुमराने अतिरिक्त उसळीचा अचूक वापर करत कर्णधार हॅरी ब्रूकला (1) चकवत रोहित शर्माकरवी स्लिपमध्ये झेलबाद केले. त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये टाकलेल्या 36 डॉट चेंडूंनी इंग्लंडच्या फलंदाजांवर जबरदस्त दबाव निर्माण केला.

प्रसिध कृष्णाने जोस बटलर (5) आणि सॅम करन (0) यांना बाद करत इंग्लंडच्या मधल्या फळीला भगदाड पाडले. इंग्लंडची 22 षटकांत 6 बाद 107 अशी दुर्दशा झाली, मात्र अनुभवी जो रूट (76) आणि विल्यम डॉसन (68) यांनी झुंजार अर्धशतके झळकावित सातव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी रचत डाव सावरला. त्यामुळे हिंदुस्थानला इंग्लंडला 258 धावांत गुंडाळता आले. पण ही जोडी फुटताच अक्षर पटेलने खालच्या फळीला गुंडाळत वन डे कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. अक्षरने 4 बळी, तर प्रसिध कृष्णा आणि गुरनूर बरार यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक – इंग्लंड – 47.5 षटकांत सर्व बाद 258 (जो रूट नाबाद 76, लायम डॉसन 68; अक्षर पटेल 4/62) पराभूत वि. हिंदुस्थान – 45.2 षटकांत 4 बाद 262 (शुभमन गिल 80 (जखमी निवृत्त), अक्षर पटेल नाबाद 57,
वॉशिंग्टन सुंदर नाबाद 52; जोश टंग 1/50).