FIFA World Cup 2026 – एम्बाप्पेचं स्वप्न मोडलं; फ्रान्सचा पराभव करत स्पेनची 16 वर्षानंतर फायनलमध्ये धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॅलस येथे खेळल्या गेलेल्या फुटबॉल विश्वचषक 2026 च्या अटीतटीच्या सामन्यात स्पेनने बलाढ्य फ्रान्सचे कडवे आव्हान मोड़ून काढत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. संपूर्ण स्पर्धेत आपल्या आक्रमक खेळीने प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारणारा फ्रान्सचा संघ स्पेनच्या शिस्तबद्ध रणनीतीसमोर सपशेल अपयशी ठरला. स्पेनने 2-0 ने बाजी मारत तब्बल 16 वर्षानंतर वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

किलियन एम्बाप्पे, ओसमाने डेम्बेले आणि मायकेल ओलिसे यासारख्या स्टार खेळाडूंचा भरणा असतानाही फ्रान्सचा संघ 2010 च्या विजेत्या संघापुढे हतबल दिसून आला. संपूर्ण लढतीवर स्पेनने आपली छाप पाडली. स्पेनचे प्रशिक्षक लुइस डी ला फुएंते यांनी अचूक रणनीती आखत एम्बाप्पे, ओलिसे आणि डेम्बेले यांना बांधून ठेवण्यात यश मिळवले. तर दुसरीकडे लॅमिन यामाल, पेड्रो पेरो यांनी झकास खेळाचे प्रदर्शन घडवले.

FIFA World Cup 2026 – मेस्सीच्या जादूला हॅरी केनचे आव्हान, अर्जेंटिना-इंग्लंड आमने सामने; दुसरी सेमी फायनल आज रंगणार

फर्स्ट हाफमध्ये 22 व्या मिनिटाला फ्रान्सच्या लुकास डिग्ने याने 19 वर्षीय लॅमिन यामाल याला चुकीच्या पद्धतीने रोखल्यामुळे स्पेनला पेनल्टी मिळाली. या पेनल्टीचा फायदा घेत मिकेल ओयारझाबालने गोल करत स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सेकंड हाफमध्ये पेड्रो पेरो याने डॅनी ओल्मोसोबत अप्रतिम वन-टू पासिंग गेम खेळत फ्रान्सच्या गोलकीपरला चकवले आणि स्पेनची आघाडी 2-0 अशी मजबूत केली.

दरम्यान, पेड्रो पोरोने प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जिंकला असला, तरी मँचेस्टर सिटीचा स्टार मिडफिल्डर रॉड्री हा स्पेनच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला. त्याने 82 टाचेस, 59 यशस्वी पासेस आणि 4 टॅकल्स केले. संपूर्ण सामन्यात एकही खेळाडू त्याला हुलकावणी देऊ शकला नाही.

16 वर्षानंतर फायनलमध्ये धडक

स्पेनच्या संघाने 2010 नंतर पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. 16 वर्षांपूर्वी स्पेनने नेदरलँडचा 1-0 असा पराभव करत विश्वचषक उंचावला होता. आता पुन्हा एकदा स्पेनचा संघ फायनलमध्ये पोहोचला असून अर्जेंटिना आणि इंग्लंडच्या लढतीत विजयी होणाऱ्या संघासोबत त्यांचा सामना होईल. तर दुसरीकडे फ्रान्सने सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी गमावली. संपूर्ण स्पर्धेत गोलवर गोल करणारा एम्बाप्पे या सामन्यात विशेष कामगिरी करू शकला नाही.