50 हजार भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील ग्रामपंचायत व नगरपरिषद हद्दीतील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी आता प्रभावी उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. या अंतर्गत नगरपालिका हद्दीत पालिका यंत्रणा, तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतींची यंत्रणा भटकी कुत्री पकडून ते पशुसंवर्धन विभागाकडे सोपवणार आहेत. पशुसंवर्धन विभाग या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांना पुन्हा संबंधित यंत्रणांच्या ताब्यात देणार आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे 50 हजार कुत्रे पकडून त्यांना जंतनाशक आणि रेबीजविरोधी लस देण्यासोबतच त्यांचे खच्चीकरण करून पुन्हा मूळ जागी सोडण्यात येणार आहे.

न्यायालयाने भटक्या कुत्र्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण यंत्रणा जाग्या झाल्या आहेत. या मोहिमेत पकडलेले कुत्रे 4 ते 5 दिवस शेल्टर हाऊसमध्ये (निवारा केंद्र) ठेवले जातील. तेथे पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर विशेष केंद्र उभारून या कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्र्ाक्रिया करतील. शस्त्र्ाक्रियेपूर्वी त्यांना जंतनाशक आणि त्यानंतर रेबीजविरोधी लस दिली जाईल. शस्त्र्ाक्रियेनंतर काही दिवस पशुसंवर्धन विभागाच्या देखरेखीखाली ठेवून हे कुत्रे पुन्हा पालिका किंवा ग्रामपंचायतींकडे सोपवले जातील.

जानेवारी महिन्यापासून जिल्हा परिषद आणि राज्य पशुसंवर्धन विभागाकडून याचे नियोजन सुरू होते. कुत्रे पकडणे आणि शस्त्र्ाक्रियेसाठी नाशिक व नंदुरबार येथील संस्था निश्चित करण्यात आल्या आहेत. खच्चीकरणाची जबाबदारी पशुसंवर्धन विभागाकडे जिल्ह्यातील शहरी भागांत भटक्या कुत्र्यांचे नियंत्रण करण्याची जबाबदारी पालिकेची, तर ग्रामीण भागात ही जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आली आहे. या दोन्ही यंत्रणांनी पकडलेल्या कुत्र्यांवर शस्त्र्ाक्रिया करण्याचे मुख्य काम पशुसंवर्धन विभाग सांभाळणार आहे.

चार ठिकाणी उभारणार शेल्टर हाऊस

जिल्ह्यातील काही शहरी भागात कुत्रे पकडून त्यांच्यावर खच्चीकरण करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. मात्र, आतापर्यंत किती कुत्र्यांवर शस्त्र्ाक्रिया झाली, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. या मोहिमेला गती देण्यासाठी जिल्ह्यात दक्षिण भागात दोन आणि उत्तर भागात दोन अशी एकूण चार शेल्टर हाऊस (निवारा केंद्रे) उभारण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागात 45 ते 50 हजार कुत्री असल्याचा अंदाज

पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भाग मिळून सुमारे 45 ते 50 हजार भटकी कुत्री असण्याचा अंदाज आहे. यामध्ये ग्रामपंचायत हद्दीत 38 ते 40 हजार, तर उर्वरित 15 नगरपालिकांच्या हद्दीत सुमारे 10 हजार कुत्र्यांचा समावेश आहे.

बिबट्या अन् भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त

अहिल्यानगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकीकडे बिबटय़ाची दहशत, तर दुसरीकडे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट यामुळे नागरिक आणि शासकीय यंत्रणा हैराण झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल अडीच लाख नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात ही भटकी कुत्री बिबटय़ासाठी सोपे भक्ष्य ठरत आहेत. यामुळे बिबटय़ांचा मानवी वस्तीतील वावर वाढला आहे.