
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची झालेली निवड ही कायदेशीरच आहे. त्यांच्या निवडीवरून पक्षात कोणताही असंतोष नाही, असे स्पष्ट करत अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाचे माजी सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्याबाबत घेतलेले आक्षेप फेटाळून लावले आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड ही पूर्णपणे योग्य पद्धतीने आणि कायदेशीरच झालेली आहे. पुणीतरी एखादी व्यक्ती पत्र किंवा नोटीस पाठवते याचा अर्थ पक्षात असंतोष आहे असा होत नाही. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात संपूर्ण पक्ष एकत्रितपणे आणि एकसंध होऊन काम करत आहे. तसेच सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत पाठवलेल्या या नोटिशीला कायदेशीर सल्ला घेऊनच योग्य ते उत्तर दिले जाईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
नोटीसला फार महत्त्व देण्याचे कारण नाही – प्रफुल्ल पटेल
सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या नोटीसशी माझा पुठलाही संबंध नाही. त्या नोटीसला फार महत्त्व देण्याचे कारण नाही. त्यांची निवड पक्षाच्या घटनेला धरूनच झाली आहे. अजितदादांच्या निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्षात काही सुधारणा आवश्यक असल्याचे मत आहे, असे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले.
सच्चिदानंद सिंह यांचा काय होता आक्षेप?
17 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणूक आयोगाला दिलेल्या सुधारित घटनेनुसार, नवीन अध्यक्ष निवडेपर्यंत प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अध्यक्षांचे सर्वाधिकार होते. त्यामुळे सरचिटणीस श्रीवास्तव यांनी कोणत्या अधिकारात 26 फेब्रुवारीला अध्यक्ष निवडीसाठी बैठक बोलावली. या बैठकीस तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची संमतीच घेण्यात आली नव्हती, असा आक्षेप घेत पक्षाचे माजी सचिव सच्चिदानंद सिंह यांनी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुन्हा पार पाडण्याची मागणी नोटीस पाठवून केली आहे.
































































