
राज्यभरात 9 जुलैला झालेल्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या 8 हजार 619 शिक्षकांचा एका दिवसाचा पगार कपात करण्यात येणार आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील 215 प्राथमिक शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.
9 जुलैच्या आंदोलनापूर्वीच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना राज्यात एकही शाळा बंद राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. तसेच शाळा बंद ठेवणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या वेतनात कपात करण्याचे आदेशही जारी करण्यात आले होते. शासनाच्या या इशाऱ्यानंतरही राज्यातील अनेक शिक्षक आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवत आता सहभागी शिक्षकांवर वेतन कपातीची कारवाई केली जात आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात एकूण 10 हजार 209 शिक्षक कार्यरत आहेत. यातील 198 शिक्षकांनी 9 जुलैच्या आंदोलनापूर्वीच आपली रजा मंजूर करून घेतली होती, तर 174 शिक्षकांनी ऐनवेळी आंदोलनात सहभाग घेत शाळा बंद ठेवल्या होत्या. तर जिल्ह्यातील पालिका शाळांमध्ये 150 शिक्षक कार्यरत असून, यातील 39 शिक्षकांनी पूर्वपरवानगीने तर 37 शिक्षकांनी ऐनवेळी आंदोलनात सहभाग घेतला. खासगी प्राथमिक शाळांमधील 1 हजार 31 शिक्षकांपैकी 7 शिक्षकांनी पूर्वपरवानगीने तर 4 शिक्षकांनी ऐनवेळी रजा घेत आंदोलनात सहभाग नोंदवला.
गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश
अशा प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्यात 9 जुलै रोजी 215 प्राथमिक शिक्षकांनी पूर्वपरवानगीशिवाय किंवा ऐनवेळी शाळा बंद आंदोलनात सहभाग घेतला होता. राज्य सरकारच्या सूचनेनुसार आता प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी या आंदोलनात सहभागी शिक्षकांचा एका दिवसाचा पगार कपात करणार आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागात आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांची संख्या नगण्य असून, त्यांची अधिकृत आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही, असे माध्यमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.






























































