
हिंदुस्थानातील अनेक प्रमुख शहरांमधील हवा विषारी झाली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय हेच जागतिक पर्यावरण कामगिरी निर्देशांकात अधोरेखित झाले आहे. या निर्देशांकात हिंदुस्थान तळाशी असून शेवटून दुसऱया स्थानी आहे. देशात वायू प्रदूषण, हरितगृह वायूंचे वाढते उत्सर्जन आणि पर्यावरण रक्षणाबाबत ठोस उपाययोजनांचा अभाव इत्यादी मुद्दय़ांवर या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
‘पर्यावरणीय आरोग्य’ या निकषात हिंदुस्थानचा 174वा, ‘परिसंस्था संवर्धना’त 171वा आणि हवामान बदलाच्या समस्येवर राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये 130 वा क्रमांक आहे. सागरी संरक्षित क्षेत्रांच्या प्रभावी संरक्षणातही हिंदुस्थानची कामगिरी समाधानकारक नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
177 देशांत 176व्या स्थानी
हा अहवाल दर दोन वर्षांनी प्रसिद्ध करून 177 देशांचा समावेश असलेला निर्देशांक जाहीर करण्यात येतो. या देशांचे निर्देशांकाच्या माध्यमातून मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यात हिंदुस्थान 176व्या स्थानी आहे. हिंदुस्थानला 100 पैकी केवळ 22.46 गुण मिळाले आहेत. दक्षिण आशियातील देशांमध्ये हिंदुस्थान शेवटच्या स्थानी आहे. उत्तर युरोपमधील एस्टोनिया या लहानशा देशाने 74.79 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.































































