
केंद्रातील मोदी सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. फडणवीस सरकारमधील वादग्रस्त व सुमार कामगिरी असणाऱ्या मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असून त्या जागांसाठी शिंदे आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरू आहे.
फडणवीस सरकारच्या विस्तारात प्रामुख्याने भाजप आणि अजित पवार गटाच्या काही मंत्र्यांकडील खात्यांत बदल करण्यात येणार आहे. याशिवाय शिंदे गटाच्या अकार्यक्षम व वादग्रस्त मंत्र्यांना वगळून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची चर्चा आहे. त्यात अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले मावळचे आमदार सुनील शेळके यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मंत्रिमंडळाबाहेर जावे लागलेले धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळू शकते अशी चर्चा आहे.
शिंदे गटाच्या तीन ते चार जणांचा पत्ता कट
सातत्याने वादग्रस्त विधाने करून सरकारची डोकेदुखी वाढवणारे शिंदे गटातील वाचाळवीर आणि कामगिरी सुमार दर्जाची आहे अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून थेट डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे.
भाजप कोअर कमिटीची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तार, पक्षाच्या प्रलंबित संघटनात्मक नियुक्त्या तसेच आगामी राजकीय रणनीतीवर सविस्तर चर्चा झाल्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या बैठकीला उपस्थित होते.





























































