IRCTC ची नवीन वेबसाईट उद्या होणार लाँच; मिळणार AI फीचर्स, रेल्वे तिकीट बुकिंगची पद्धत बदलणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी रेल्वेचे तिकीट बुकिंग आता अधिक सोपे आणि जलद होणार आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि तिकीट बुकिंग करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन, आयआरसीटीसी (IRCTC) लवकरच आपली नवीन आणि अद्ययावत वेबसाईट लाँच करणार आहे. या नवीन पोर्टलमध्ये अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, यामुळे विशेषतः तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेतील अडथळे दूर होण्यास मोठी मदत मिळणार आहे, असे बोलले जात आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, नवीन वेबसाईटच्या माध्यमातून प्रवाशांना एक वेगवान आणि अधिक सुरक्षित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सणांच्या काळात किंवा सुट्ट्यांमध्ये तत्काळ तिकीट काढताना अनेकदा वेबसाईट संथ गतीने चालण्याची किंवा क्रॅश होण्याची मोठी समस्या प्रवाशांना भेडसावत असते. मात्र नवीन AI आधारित प्रणालीमुळे एकाच वेळी येणारा युझर्सचा ट्रॅफिक उत्तमरीत्या हाताळला जाईल. परिणामी तत्काळ तिकीट बुकिंगचा अनुभव अधिक सुरळीत होईल, पेमेंट फेल्युअरच्या समस्या कमी होतील आणि प्रवाशांचा वेळ वाचेल.

याशिवाय नवीन पोर्टलमध्ये अनेक प्रगत फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे, असे वृत्तात सांगण्यात आले आहे. वेबसाईटचा युझर इंटरफेस (UI) अधिक आकर्षक आणि वापरण्यास सोपा बनवण्यात आला आहे. AI तंत्रज्ञानामुळे प्रवाशांच्या जुन्या बुकिंगच्या सवयी आणि प्राधान्ये लक्षात घेऊन त्यांना स्मार्ट रेकमेंडेशन्स देखील दिले जातील. तसेच पेमेंट गेटवे अधिक सक्षम करण्यात आला असून, तिकीट कॅन्सलेशन आणि रिफंड प्रक्रियाही पूर्वीपेक्षा अधिक वेगवान करण्यात आली आहे, असेही वृत्तात सांगण्यात आले आहे.