सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला कलाकारांचा वाढता पाठिंबा; झीनत अमान, नसीरुद्दीन शाह यांच्यासह अनेक दिग्गजांनी व्यक्त केली चिंता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला आता कलाकारांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या उपोषणाचा १७ वा दिवस उजाडला असून, वांगचुक यांची ढासळती प्रकृती पाहता अनेक चित्रपट कलाकारांनी सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आणि वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. झीनत अमान, नसीरुद्दीन शाह, अभय देओल आणि ओमी वैद्य यांसारख्या दिग्गजांनी सोशल मीडियाद्वारे आपली चिंता आणि पाठिंबा व्यक्त केला आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी इन्स्टाग्रामवर एक सविस्तर पोस्ट शेअर करून सरकारला संवाद सुरू करण्याची विनंती केली आहे. वांगचुक यांचे स्नायू कमकुवत होत असून त्यांना तीव्र वेदना होत असल्याच्या बातम्या वाचून आपल्याला दुःख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील फुंसुक वांगडू हे लोकप्रिय पात्र वांगचुक यांच्यापासूनच प्रेरित होते, याची आठवण करून देत झीनत अमान यांनी म्हटले आहे की, शांततापूर्ण आंदोलनांना सरकारने चर्चेतूनच उत्तर दिले पाहिजे. देशातील एका महान विचारवंताचा असा बळी जाताना आपण मूकदर्शक बनून राहू शकत नाही, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये ठळकपणे नमूद केले.

दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, त्यांच्या पत्नी व अभिनेत्री रत्ना पाठक शाह, लेखिका अरुंधती रॉय आणि अर्थशास्त्रज्ञ जयंती घोष यांनी एक संयुक्त निवेदन जारी करत वांगचुक यांना उपोषण थांबवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी वांगचुक यांच्या संघर्षाला सलाम करत म्हटले आहे की, “पुढील लढाई खूप मोठी आणि कठीण आहे, त्यामुळे देशाच्या भविष्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे, कृपया तुम्ही तात्काळ उपोषण मागे घ्यावे.” यासोबतच थ्री इडियट्स फेम अभिनेता ओमी वैद्य याने देखील एक व्हिडीओ शेअर करत, “मला फुंसुक वांगडूला मरताना पाहायचे नाही,” अशी भावनिक साद घालत सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. अभिनेता अभय देओल यानेही वांगचुक यांच्या आंदोलनाचे फोटो शेअर करत आपला भक्कम पाठिंबा दर्शवला आहे.