
दापोली तालुक्यातील हर्णे गावासह परिसराची तहान भागवणारे अडखळ हद्दीतील खेम धरण जुलै महिन्यातील मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या भिंतीवरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, ७ जुलैपासून या धरणातून गावासाठी नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. चालू वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस हे धरण कोरडे पडल्यामुळे हर्णेवासीयांचा नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. खेम धरण आटल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून ‘बांधतिवरे’ योजनेवरून पाणी सुरू करण्यात आले होते. मात्र, ही पाईपलाईन अतिशय जुनी, जीर्ण आणि डोंगराळ भागातून येत असल्याने गळतीचे प्रमाण मोठे होते. परिणामी, ग्रामस्थांना सुरुवातीला आठवड्यातून एकदा, तर नंतर तब्बल १५ दिवसांतून एकदा पाणी मिळत असल्याने मोठी पाणीटंचाई निर्माण झाली होती. आता धरण तुडुंब भरल्यामुळे हर्णेकरांची ही तीव्र पाणीटंचाई अखेर पूर्णपणे मिटली आहे.
सुमारे ३६ कोटी ४५ लाख लिटर (१३.५० एमसीएफटी) पाणी साठवण क्षमता असलेल्या या ऐतिहासिक खेम धरणाच्या बांधकामाची सुरुवात १९७१ मध्ये झाली असून, ते १९७४ मध्ये पूर्ण झाले. रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेले हर्णे बंदर आणि मोठी व्यापारी बाजारपेठ यामुळे येथे स्थानिक लोकसंख्येसह परप्रांतीय मजुरांची संख्याही मोठी आहे. या परिसरातील पाजपंढरी, पाळंदे आणि अडखळ या गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत हेच धरण राहिले आहे. सध्या या धरणातून प्रामुख्याने हर्णे गाव, पाळंदे आणि अडखळची खेमवाडी यांना पाणीपुरवठा केला जातो. हर्णे गावासाठी बांधतिवरे नळपाणी योजना उपलब्ध असली, तरी गावाची मुख्य भिस्त या खेम धरणावरच असते. यंदा धरण वेळेत भरल्याने व पुरवठा सुरळीत झाल्याने स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.






























































