
इराण आणि अमेरिकेतील युद्ध पुन्हा भडकल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची नाकेबंदी जाहीर केली. होर्मुझमधून जाणऱ्या प्रत्येक मालवाहू जहाजाला 20 टक्के टोल द्यावा लागेल, असे सांगत ट्रम्प यांनी होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली. यावर इराणने ट्रम्प यांना सडेतोड उत्तर दिले असून होर्मुझमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. या सागरी मार्गाची सुरक्षा आणि व्यवस्थापन हा इराणचा हक्क असून त्याच्या सुरक्षेसाठी मागे हटणार नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे. होर्मुझचा मार्ग पुन्हा बंद झाल्यामुळे जगावर पुन्हा ऊर्जा संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
अमेरिका आणि इराणमधील युद्धबंद संपल्यानंतर अमेरिकेने इराणवर हल्ले केले. त्यानंतर इराणनेही आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ले करत अमेरिकेचे मोठे नुकसान केले. होर्मुझच्या सामुद्रधुनीत हिंदुस्थानी खलाशी असलेल्या जहाजावर रविवारी हल्ला झाला होता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट करत होर्मुझचा मार्गाची सुरक्षा अमेरिका सांभाळणार असून त्यासाठी होर्मुझमधून जाणाऱ्या प्रत्येक जहाजकडून 20 टक्के टोल वसूल करण्यात येईल, अशी घोषणा केली. ट्रम्प यांनी स्वतःला होर्मुझचे गार्डियन म्हटले आहे.
इराणचे ट्रम्प यांना प्रत्युत्तर
इराणच्या लष्कराच्या खतम अल-अंबिया मुख्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जाणार नाही. या सामुद्रधुनीची सुरक्षा आणि संचालन हा इराणचा विशेषाधिकार आहे आणि कोणताही बाह्य हस्तक्षेप स्वीकारला जाणार नाही. तर, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण कायम राहील. या मुद्दय़ावरून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे सल्लागार मोहम्मद मोखबर यांनी स्पष्ट केले.
कच्चे तेल 3 टक्क्यांनी महाग
आधी इराणने होर्मुझ बंद असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता अमेरिकेने नाकेबंदी केली. दोन्ही देशांमध्ये वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाचे दर 3 टक्क्यांनी वाढले. सोमवारी कच्च्या तेलाचे दर सुमारे 78 ते 80 डॉलरच्या जवळपास होते.
इराणचा अमेरिकेला झटका
इराणने आखाती देशांमधील अमेरिकन एअरबेसवर तीन टप्प्यांमध्ये भीषण हल्ले केले. अमेरिकेचे ‘पेट्रियट एअर डिफेन्स सिस्टम’ आणि रडार यंत्रणा त्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. याशिवाय कुवैत येथील ‘अली सालेम एअरबेस’वरील मुख्य इंधन टाक्यादेखील उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. याचा व्हिडीओ इराणने सोशल मीडियावर आज टाकला.





























































