झाडे तोडणार मुलुंडमध्ये आणि पर्यायी वृक्ष लावणार पनवेलमध्ये; स्कायवॉकच्या कामात 10 झाडांवर कुऱ्हाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलुंड पश्चिम येथील महाराणा प्रताप चौक, एलबीएस रोडवर सुमारे 24 कोटी रुपये खर्चून स्कायवॉक उभारण्यात येत आहे. स्कायवॉकच्या कामामुळे 10 झाडे बाधित होणार आहेत. त्यातील सात झाडे कापली जाणार आहेत, तर तीन झाडांचे पुनर्रेपण करण्यात येणार आहे. या बाधित झाडांच्या बदल्यात महापालिका एकूण 238 झाडे लावणार आहे.

मुलुंड येथील स्कायवॉकचे काम 12 जानेवारी 2024 रोजी कंत्राटदार मेसर्स ए. बी. इन्फ्राबिल्ड पंपनीला देण्यात आले आहे. दोन वर्षांत हे काम पूर्ण करायचे असून सध्या ते प्रगतिपथावर आहे. या कामात 10 झाडे बाधित होणार आहेत. यामध्ये सात झाडे कापली जाणार आहेत, तर तीन झाडांचे पुनर्रेपण तर पाच झाडे आहे तिथेच ठेवण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर आता ही झाडे कापण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्याबदल्यात महापालिका 238 नवीन झाडे लावणार आहे. मात्र नवीन झाडांची लागवड करण्याकरता आणि तीन झाडांचे पुनर्रोपण करण्याकरता जागा उपलब्ध नसल्याने पालिकेने महाराष्ट्र वन विकास महामंडळाकडे विचारणा केली आहे. महामंडळाने एकूण 24.96 लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्यानुसार हा निधी महामंडळाला देण्यात येणार आहे.

हा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर महामंडळाच्या वतीने पनवेल रेंजमधील वडघर येथील 0.21 हेक्टर जागेवर या 238 झाडांची लागवड केली जाणार आहे. या कामासाठी 21.16 लाख रुपये दिले जाणार असल्याची माहिती पूल विभागाच्या अधिकाऱयांनी दिली. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येणार आहे.