
सलमान खानच्या बहुप्रतिक्षित ‘मातृभूमी’ चित्रपटाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. यंदा प्रदर्शित होण्याची अपेक्षा असलेल्या या चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा एकदा पुढे ढकलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, हा चित्रपट आता थेट 2027 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. मात्र याबाबत निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया दिली नाही.
‘मातृभूमी’ हा सलमानचा चित्रपट याआधी 30 एप्रिल 2026 ला प्रदर्शित होणार होता. त्यानंतर ऑगस्ट किंवा ऑक्टोबरमध्ये रिलीज होण्याची चर्चा रंगली होती. मात्र अद्याप प्रदर्शनाची तारीख निश्चित झालेली नसल्याने चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.
काही अहवालांनुसार, चित्रपटातील काही आशय आणि चीनशी संबंधित उल्लेखांबाबत संरक्षण मंत्रालयाने आक्षेप नोंदवले होते. या कारणामुळे चित्रपटाच्या अंतिम प्रक्रियेला विलंब झाल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर, मोठ्या बॉलिवूड चित्रपटांनी महत्त्वाचे प्रदर्शन स्लॉट आधीच निश्चित केल्याने ‘मातृभूमी’साठी योग्य वेळ मिळणेही आव्हानात्मक ठरत असल्याची चर्चा आहे.
चित्रपटसृष्टीतील जाणकारांच्या मते, दसरा किंवा नोव्हेंबर 2026 हा ‘मातृभूमी’साठी अनुकूल कालावधी ठरू शकतो. परंतु निर्माते आधी चित्रपटाचे सर्व तांत्रिक आणि पोस्ट-प्रॉडक्शनचे काम पूर्ण करण्यावर भर देत असून, घाईघाईने प्रदर्शन करण्याच्या मनस्थितीत नाहीत.

































































