एलिफंटा बेटावरील भूमिपुत्रांच्या रोजगारावर फिरणार मेरिटाइम बोर्डाचा बुलडोझर, ६९ कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एलिफंटा बेटावर ५० वर्षांपासून पर्यटनावर आधारित व्यवसाय करणाऱ्या गरीब स्थानिक भूमिपुत्रांच्या ६९ दुकानांवर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचा बुलडोझर फिरणार आहे. उद्यापासून ही कारवाई केली जाणार असून यासाठी मोठा फौजफाटा मागविण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या प्रादेशिक विभागाच्या कारवाईमुळे ६९ कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट उभे ठाकणार आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अखत्यारीत असलेल्या शेतबंदर जेट्टीपासून एक किमी अंतरापर्यंतच्या पोच मार्गापर्यंत एलिफंटा बेटावरील १०३ स्थानिक भूमिपुत्र व्यावसायिकांची कटलरीची दुकाने आहेत. मागील ५० वर्षांपासून हे स्थानिक गरीब व्यावसायिक छोटी छोटी दुकाने थाटून चणेफुटाणे, मके, विविध प्रकारच्या रंगीबेरंगी टोप्या, शोभिवंत वस्तू, कटलरी सामान, खाद्यपदार्थ विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.

महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अखत्यारीतील जागा असल्याने भुईभाडे लागू करण्याची अनेक वर्षांपासून व्यावसायिकांची मागणी आहे. मात्र मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून व्यावसायिकांच्या या रास्त मागणीकडे सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले जात असल्याचा दुकानदारांचा आरोप आहे.

 

लाखो रुपयांचा दंड आकारला
दुकानदारांशी कोणत्याही प्रकारची बैठक, चर्चा न करताच मेरिटाइम बोर्डाने जागा भुईभाड्याने देण्याबाबत ठरविलेल्या धोरणाचा हवाला देत १०३ स्थानिक दुकानदारांना प्रत्येकी जीएसटीसह लाखो रुपयांच्या व्याजासह दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. दंडाची रक्कम न भरल्यास दुकाने पाडण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. मात्र लाखो रुपयांच्या दंडात्मक कारवाईबाबत दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. दंडाची रक्कम कमी करण्याची मागणी करण्यात आली नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.