
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात गोरगरीब रुग्णाच्या पिळवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शस्त्रक्रिया झालेल्या एका महिला रुग्णाला वॉर्डमध्ये उलटी झाली. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी ती उलटी चक्क त्याच महिला रुग्णाकडून साफ करून घेतली.
संगीता मनोहर पवार या महिलेवर काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तिला पुढील उपचारांसाठी महिलांच्या वॉर्डामध्ये दाखल करण्यात आले. शनिवारी रात्री संगीता पवार यांना उलटी झाली. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांनाच उलटी साफ करायला सांगितले. संगीता पवार यांचे पती मनोहर पवार यांनी याबाबत विचारणा केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे हाऊसकीपिंगचा स्टाफ नाही म्हणून रुग्णांकडूनच साफसफाई करून घेतो असे सांगितले. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्ण उपचारांसाठी जातात मात्र त्यांची अशी पिळवणूक होत आहे. रुग्णालयात अनागोंदी कारभार सुरू असून रुग्णांची हेळसांड होत आहे.




























































