
गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसाच्या माऱ्याने घोडबंदर घाटातील करपे कंपाऊंड परिसरात मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने घोडबंदर मार्गावर रविवारी सकाळी प्रचंड वाहतूककोंडी झाली. तब्बल १५ ते २० किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. चिंचोटी नाक्यापासून कासारवडवली, आनंदनगरपर्यंत वाहतूक मंदावली होती. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी पिकनिक मूडमध्ये घराबाहेर पडलेल्या ठाणेकरांचा या कोंडीत अडकून चांगलाच घामटा निघाला. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या वाहतूककोंडीमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांचे प्रचंड हाल झाले.





























































