
शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सना बेदम मारहाण करणारे शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी डोंबिवलीतील १० महिला संघटनांनी केली आहे. या संघटनांनी ऑनलाइन बैठक घेऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. यानंतर महिला संघटनांच्या प्रतिनिधींनी सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
६ जुलै रोजी शास्त्रीनगर रुग्णालयात घुसून महिला तसेच पुरुष डॉक्टर आणि नर्स यांना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी अश्लील शिवीगाळ करून बेदम मारहाण केली होती या मारहाणीच्या घटनेचे तीव्र पडसाद
राज्यभर उमटले.
यानंतर रमेश हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली. नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी महिलांवर हात उचलणे अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर कठोर कलमे लावून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी डोंबिवलीतील दहा महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत. डोंबिवली महिला महासंघाच्या नेतृत्वाखाली भारतीय स्त्री शक्ती, डोंबिवली महिला महासंघ, दुर्गा वाहिनी, संयुक्त महिला मंडळ, ज्ञानप्रबोधिनी, मानिनी महिला मंडळ, स्वरुपिणी भगिनी मंडळ, परिवर्तन महिला संस्था आदी दहा संघटनांच्या प्रतिनिधींनी डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांची भेट घेऊन निवेदन दिले
‘पोश’ कायद्याची अंमलबजावणी करा
रमेश म्हात्रे यांच्यासह सर्व आरोपींना कठोर शिक्षा करण्याबरोबरच कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पोश’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी महिला संघटनांनी केली आहे तसेच राजकीय दबाव झुगारून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी महासंघाच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री कर्वे कोषाध्यक्षा सुनीती रायकर, सई बने, संगीता देशपांडे, डॉ. विंद भुस्कुटे यांनी पोलिसांकडे केली.
सीसीटीव्हीमुळे ‘कर्तृत्व’ जगजाहीर
रमेश म्हात्रे यांनी शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना शिवीगाळ आणि बेदम मारहाण केल्याचा सर्व प्रकार रुग्णालयाच्या सीसीटीव्ह कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे त्यांचे ‘कर्तृत्व’ जगजाहीर झाले. मात्र गेल्या ३० वर्षांपासून कोपर प्रभागातील लोकांना जमीन विषयावरून इमारत पुनर्विकास प्रकरणावरून दादागिरी, दटावण्याचे प्रकान त्यांच्याकडून सुरू आहेत. आतापर्यंत आम्ही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत होता, अशा प्रतिक्रिया कोपर प्रभाग, शास्त्रीनगर रुग्णालय परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केल्या





























































