
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बेफाम बरसलेला पाऊस गायब झाला आहे. पुढील 5 दिवसांत पावसाची शक्यता नाही. मान्सून पुन्हा सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण नाही. पाकिस्तानातून येत असलेल्या उष्ण वाऱ्यांच्या प्रभावामुळे पश्चिम आणि मध्य हिंदुस्थानातून पाऊस गायब झाला आहे. मुंबई, महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागात पुढील आठवडा कोरडच राहणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, दिल्लीसह बहुतांश भागात पाच दिवस पावसाची कोणतीही शक्यता नाही. राजस्थानमध्ये पारा 40 अंशाच्या वर गेला आहे. देशातील जवळपास 70 टक्के भागातून पावसाचे ढग गायब झाले आहेत. याचे कारण म्हणजे, पाकिस्तानातून येणारे उष्ण आणि कोरडे वारे हिंदुस्थानातून आर्दता असलेली हवा पूर्वेकडे ढकलत आहेत. हे वारे अरबी समुद्र, मध्य आणि दक्षिण हिंदुस्थानापर्यंत पोहोचले असून पूर्व किनारपट्टीदेखील ते व्यापू शकतात. या वाऱ्यांमुळे पावसासाठी आवश्यक असलेली आर्दता ओढली जात नाही. परिणामी पाऊस कमी होतो.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 12 जुलैनंतर मेडन-ज्युलियन ऑस्सिलेशन सक्रिय राहणार नाही. ही यंत्रणा सक्रिय असल्यास चांगला पाऊस पडतो. याशिवाय भूमध्यरेखील ‘रॉस्बी’ वारेदेखील प्रतिकूल झाले आहेत. त्यामुळे आर्द वारे विरुद्ध दिशेने जाऊ शकतात.
तीन वादळांकडून पावसाची अपेक्षा
प्रशांत महासागरात ‘बावी’ हे चक्रीवादळ चीनकडे सरकले असून ते आता कमकुवत झाले आहे; मात्र प्रशांत महासागरात आणखी तीन कमी दाबाचे पट्टे निर्माण होत आहेत. त्यांचे रूपांतर चक्रीवादळात होऊ शकते, त्यापैकी तएक बंगालच्या उपसागरात पोहोचल्यास हिंदुस्थानात पुन्हा मान्सून सक्रिय होऊ शकतो. त्यामुळे या वादळांकडून पावसाची अपेक्षा आहे.


























































