
दापोली तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका आता हर्णे येथील ऐतिहासिक गोवा किल्ल्यालाही बसला आहे. शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या किल्ला संवर्धनाच्या कामातील नव्याने उभारलेल्या तटबंदीचा काही भाग कोसळल्याने शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अरबी समुद्रकिनारी वसलेला गोवा किल्ला हा मराठा आरमाराच्या इतिहासाचा महत्त्वाचा वारसा मानला जातो. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या किल्ल्याचे संवर्धन सुरू झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण होते. काम अंतिम टप्प्यात आले असतानाच झालेल्या अतिवृष्टीमुळे तटबंदीच्या एका भागाचे नुकसान झाले. मुसळधार पाऊस, मातीची धूप आणि समुद्रकिनारी निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे ही तटबंदी कोसळल्याचे प्राथमिक स्तरावर सांगितले जात आहे.
नव्याने बांधलेली तटबंदी एवढ्या कमी कालावधीत कोसळल्याने संवर्धनाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची तांत्रिक चौकशी करून कामाच्या दर्जाची तपासणी करावी, दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त तटबंदी तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून होत आहे.
गोवा किल्ला हा दापोलीतील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. त्यामुळे संवर्धनाचे काम दर्जेदार व टिकाऊ पद्धतीने पूर्ण करून या ऐतिहासिक वारशाचे जतन करावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.





























































