
हल्ली प्रत्येक जण गूगल मॅपचा सर्रास वापर करतो. मात्र हाच गूगल मॅप अनेकदा धोका देतो आणि भलत्याच ठिकाणी पोहचवतो. अशीच एक घटना ऑस्ट्रेलियाहून जम्मू-कश्मीर फिरायला आलेल्या पर्यटकांसोबत घडली. जम्मू आणि कश्मीर फिरण्यासाठी निघालेल्या चार ऑस्ट्रेलियन पर्यटकांना गूगल मॅपने हिमाचल प्रदेशातील काश्मीर गावात पोहचवले.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीहून एक मॉडिफाईड ऑटोरिक्षा भाड्याने घेऊन चार ऑस्ट्रेलियन पर्यटक जम्मू आणि कश्मीरला निघाले. यासाठी त्यांनी गूगल मॅप्सची मदत घेतली. मात्र गूगल मॅपने त्यांना जम्मू-कश्मीरचा मार्ग दाखवण्याऐवजी हिमाचल प्रदेशातील हमीरपूरमधील काश्मीर गावात नेले.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन पर्यटकांनी प्रवासादरम्यान चंदीगड, रोपर, किरतपूर, नांगल, उना, बरसर, माहेरे आणि दंडडू या ठिकाणांमधून जात गूगल मॅप्सने दिलेला शॉर्टकट मार्ग घेतला आणि हमीरपूर जिल्ह्यातील काश्मीर गावात पोहोचले.
त्यानंतर 15 मिनिटे थांबून त्यांनी योग्य ठिकाण नोंदवले. त्यानंतर ते कांगू मार्गे नादौनला पोहोचले आणि तेथून जम्मू आणि कश्मीरला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाने राणीतालकडे रवाना झाले. गूगल मॅप्समधील या विचित्र त्रुटीमुळे त्या परदेशी पर्यटकांचा प्रवास अविस्मरणीय ठरला आणि ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.


























































