
फिनलंडमध्ये दोन महिन्यांहून अधिक काळ बेपत्ता झालेला हैदराबादचा विद्यार्थी समुद्रात मृत अवस्थेत आढळला आहे. मणीदीप रेड्डी (18) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. रेड्डी हा लॅपीनरांटा-लाहटी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सॉफ्टवेअर आणि सिस्टम्स इंजिनिअरिंगचे पदवी शिक्षण घेत होता.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रेड्डी हा 5 मे रोजी हेलसिंकीमधील एका सुपरमार्केटमध्ये शेवटचा दिसला होता. त्याने लाहटी ते हेलसिंकी असा रेल्वे प्रवास केला होता. रात्री 8 च्या सुमारास क्रूनुवोरनरांटा (Kruunuvuorenranta) येथील ‘के-मार्केट’मध्ये त्याला शेवटचे पाहिले गेले होते. त्यानंतर तो बेपत्ता होता.
दोन महिन्यांहून अधिक काळ उलटल्यानंतर अखेर गुरुवारी, 9 जुलै 2026 रोजी क्रूनुवोरनरांटा येथे अधिकाऱ्यांनी केलेल्या शोधमोहिमेदरम्यान समुद्रात त्याचा मृतदेह सापडला, असे फिनलंड पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे.
मृतदेहासोबत रेड्डीचे फिनलंडमधील ओळखपत्र, त्याच्या आईचे बँक कार्ड आणि हिंदुस्थानी चलन आढळल्याने त्याची ओळख पटण्यास मदत झाली. याप्रकरणी नॅशनल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मृत्यूच्या कारणाचा तपास करत आहे. या प्रकरणात कोणताही गुन्हा घडल्याचा संशय नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, मणीदीप रेड्डीच्या कुटुंबाला हा मृत्यू संशयास्पद वाटत आहे. कुटुंबाचे वकील के.एल.बी. कुमार यांनी शनिवारी आरोप केला की, फिनलंड सरकार या संपूर्ण प्रकरणाला नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देऊन अनेक तथ्ये/गोष्टी जाणीवपूर्वक दडपून टाकत आहे. कुटुंबाने मुलाच्या मृत्यूची योग्य प्रकारे चौकशी करण्याची मागणी करत आहे.





























































