
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पालघर जिल्ह्यातील धरणांना ‘बूस्टर डोस’ मिळाला आहे. धुवांधार पावसामुळे सूर्या नदीसह अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात जोरदार वाढ होऊ लागली आहे. धामणी धरणात सध्या तब्बल ५३ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर बारवी धरण ६६.८० टक्के भरले आहे. विशेष म्हणजे कवडास धरण ओव्हरफ्लो झाल्याने १७ दरवाजांतून सूर्या नदीपात्रात सुमारे ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
सूर्या प्रकल्पातून जिल्ह्यातील शेती, औद्योगिक वसाहतींसह वसई-विरार आणि मीरा-भाईंदरसारख्या मोठ्या महानगरपालिका क्षेत्रांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघणार आहे.
गेल्या आठवडाभरात धरण परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे काही भागांत पूरस्थिती, वाहतूक अडथळे आणि शेतीचे नुकसान अशी संकटे निर्माण झाली असली तरी दुसरीकडे धरणे भरू लागल्याने आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
धामणी धरणातील पाणीसाठा पुढील काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बारवी धरण क्षेत्रात तब्बल २४७.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पाण्याची पातळी ६३.८० मीटरवर पोहोचली आहे. त्यामुळे पाणीबाणी निर्माण झालेल्या अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि ठाणे शहराला दिलासा मिळाला आहे.
सूर्या नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
कवडास धरण ओव्हरफ्लो झाल्याने त्याच्या १७दरवाजांतून सूर्या नदीपात्रात सुमारे ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे तसेच पूरपाण्यातून वाहने अथवा पायी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. धामणी धरणातील पाणीसाठा ५३ टक्क्यांवर पोहोचल्याने शहरी पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा मिळणार आहे.






























































