
बंगळुरूमध्ये डिलिव्हरी बॉयने एका महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून, तिच्यासमोर अश्लील कृत्य केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी महिलेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा आरोप केला आहे.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित डिलिव्हरी बॉय तिच्या घरी एक पार्सल देण्यासाठी आला होता. पार्सल दिल्यानंतर त्याने महिलेकडे घरातील शौचालय वापरण्याची परवानगी मागितली. परंतु, अनोळखी व्यक्तीला घरात घेण्यास महिलेने स्पष्ट नकार दिला. मात्र तो जबरदस्ती माझ्या घरात घुसला.
“मी अत्यंत नम्रपणे त्याला नकार दिला आणि सांगितले की मी अनोळखी लोकांना माझ्या फ्लॅटमध्ये येऊ देत नाही. तू शेजारी राहणाऱ्या पुरुषांकडे जाऊन विचार, असा सल्लाही मी त्याला दिला. मात्र, माझ्या वारंवार नकार देण्याकडे दुर्लक्ष करत त्याने आपल्या चपला काढल्या आणि तो जबरदस्तीने माझ्या घरात घुसला. त्यानंतर त्याने शौचालयातून बाहेर येत केलं माझ्यासमोर अश्लील कृत्य करत त्याचे लिंग फ्लॅश केले. या प्रकारामुळे मला प्रचंड धक्का बसला. जेव्हा एखादी महिला ‘नाही’ म्हणते, तेव्हा तिथेच संवाद संपायला हवा. कोणालाही असं वागण्याचा व घरात जबरदस्तीने घुसण्याचा अधिकार नाही,” असे त्या महिलेने सांगितले.
या प्रकरणी महिलेने मराठाहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी विजय मल्लिकार्जुन कामत नावाच्या तरुणाला अटक केली असून तो फ्लिपकार्टमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

























































