
ऑनलाइन किराणा आणि झटपट वितरण सेवा देणाऱ्या स्विगी इन्स्टामार्टला (Swiggy Instamart) अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) तब्बल नऊ नोटिसा बजावल्या आहेत. ग्राहकांकडून कालबाह्य, खराब, कुजलेले आणि खाण्यास अयोग्य अन्नपदार्थ वितरित केल्याच्या तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
एफएसएसएआयने स्विगी इन्स्टामार्टकडे या प्रकरणी सविस्तर खुलासा आणि नियमांचे पालन केल्याचा अहवाल मागवला आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्राधिकरणाने दिला आहे.
एफएसएसएआयच्या नोटिसांनुसार, ग्राहकांनी स्विगी इन्स्टामार्टमार्फत कालबाह्य, खराब, कुजलेले आणि दूषित अन्नपदार्थ मिळाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यामध्ये Healthify 100% Whey Protein, Noice Homestyle Madras Mixture with Peanuts, Akshayakalpa Organic Eggs आणि Kakke da Paratha या उत्पादनांचा समावेश आहे.
तक्रारीनुसार, व्हे प्रोटीन आणि स्नॅक्सची पाकिटे मुदत संपल्यानंतर वितरित करण्यात आली होती. तसेच अंडी कुजलेली असून त्यातून दुर्गंधी येत असल्याने ती खाण्यास अयोग्य होती. काक्के दा पराठा हा पदार्थही खराब झालेला असून त्यातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.
याशिवाय, एफएसएसएआयने “NOICE” या ब्रँडच्या अंड्यांच्या विक्रीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्विगी इन्स्टामार्टच्या विद्यमान परवान्यात या उत्पादनाचा समावेश नसल्याचा संशय व्यक्त करत, या उत्पादनाची विक्री तातडीने थांबवण्याचे आणि आवश्यकता असल्यास परवान्यात बदल करून घेण्याचे निर्देश कंपनीला देण्यात आले आहेत.
























































