
आषाढीवारीच्या सोहळ्यासाठी देशभरातून पंढरीत येणाऱ्या रेल्वेच्या लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे विभागाने 150 फेऱ्यांचे विशेष नियोजन केले असल्याची माहिती रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक जयदीप प्रदक्षिणे यांनी दिलीय.
येत्या 25 जुलै रोजी आषाढी वारीचा सोहळा पंढरपूर मध्ये साजरा होतो आहे. या सोहळ्याला देशभरातून लाखो भाविक उपस्थिती लावतात. पंढरपूरला येण्यासाठी वारकरी भाविकांना अल्प दरात सुलभ, सुरक्षित आणि सोईची वाहतूक म्हणून वारकरी रेल्वेला प्राधान्य देतात.
रेल्वेने पंढरपूरला येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी विशेष नियोजन केले आहे. खास करुन मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ, जळगाव, मिरज, सोलापूर, कुर्डुवाडी, कोल्हापूर, परळी आणि परभणी या प्रमुख शहरांमधून मागणीनुसार रेल्वे उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
वारीच्या कालावधीत गेल्या वर्षी 137 फेऱ्यांची सेवा देण्यात आली होती यावर्षी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने, रेल्वे विभागाने दि. 20 जुलै ते 29 जुलै दरम्यान 150 फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
रेल्वे वाहतूक सुविधा बरोबर पंढरपूर रेल्वे स्थानकावर निवारा शेड उभारण्यात आले आहे. या शेडमुळे रेल्वेच्या प्रतिक्षेत असलेल्या सुमारे तीन हजार भाविकांची ऊन, वारा व पावसापासून संरक्षण होणार आहे.
पादचारी पूल, सार्वजनिक स्वच्छतागृह, येण्या जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग, पिण्याचे स्वच्छ पाणी, प्रशस्त बैठक व्यवस्था आदी मूलभूत सुविधा पुरविण्यात प्रशासनाने भर दिला आहे.
देशभरातील श्री विठ्ठल भक्ताला रेल्वेने पंढरीत येता यावे यासाठी कॅनेटिंग गाड्यांची व्यवस्था कशी करता येईल यावर नियोजन सुरु आहे. गेल्या वर्षीपेक्षा अधिक भाविकांना रेल्वेने सुलभ व सुखकर सेवा देण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे जयदीप प्रदक्षिणे यांनी दिली.



























































