
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भाजपवर आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी आणि त्यांची राजकीय ताकद कमकुवत करण्यासाठी भाजप आर्थिक ताकदीचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सौगत रॉय म्हणाले की, “हा भाजपचा नेहमीचा खेळ आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना ते सर्वत्र त्रास देतात. भाजपकडे पैशांची कोणतीही कमतरता नाही. मी या प्रकाराचा निषेध करतो. जम्मू-काश्मीर हा अत्यंत संवेदनशील प्रदेश आहे. त्यामुळे तेथे आमदारांची फोडाफोड किंवा घोडेबाजाराचे राजकारण होऊ नये.”
यापूर्वी शनिवारी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भाजपवर गंभीर आरोप केला होता. जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (JKNC) पक्षाच्या एका आमदाराला पक्षांतर करण्यासाठी 20 ते 30 कोटी रुपयांची ऑफर आणि मंत्रीपदाचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.
ओमर अब्दुल्लांच्या या आरोपांनंतर जम्मू-काश्मीरच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. मात्र, या आरोपांवर भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.



























































