
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मंडणगड तालूक्यातील वेसवी बंदरात जलपर्यटनासाठी 1 कोटी रूपये खर्च करून सन 2016/17 मध्ये 1 हाऊसबोट जलपर्यटनासाठी उपलब्ध करून दिली होती. पर्यटकांच्या मागणीनुसार त्यांना कोकण समुद्र किनारपट्टीचे नैसर्गिक सृष्टीसौंदर्य या बोटीच्या सफरीतून पाहता येणार होते. मात्र, ही हाऊसबोट चालविण्यासाठी ठेका घेणाऱ्याला तब्बल 25 लाखाची अनामत रक्कम भरावी लागणार होती. जलपर्यटनाचा नव्याने सुरू होणारा व्यवसाय किती प्रमाणात होईल याचा ठेकदाराला भरवसा नसल्याने एवढी मोठी अनामत रक्कम भरून कोणीही हाऊसबोट चालविण्यासाठी पुढे आले नाही. त्यामुळे जलपर्यटनाची एमटीडीसीची संकल्पना केवळ कागदावरच राहीली.
एमटीडीसीला हाऊस बोट चालविण्यासाठी ठेकेदारच मिळाला नाही. त्यामुळे एमटीडीसीची हाऊस बोटीची संकल्पना कागदावरच राहीली आणि वापराविना हाऊस बोट पार सडून गेली. त्यामुळे हाऊस बोट खरेदीसाठीचा शासनाचा 1 कोटीचा विकास निधी हा एमटीडीसीच्या नाकर्तेपनामुळे वाया गेला.
सन 2016/17 मध्ये एमटीडीसीने वेसवी बंदरात आणून उभ्या केलेल्या या हाऊसबोटीत राहण्याची सोय होती. बोटीत 2 अलिशान रूम होते. जलपर्यटन करणाऱ्या पर्यटकांना एमटीडीसीने 10 तासांच्या जलपर्यटनाची अट घातली होती. या जलपर्यटनासाठी 8 हजाराचे भाडे आकारले जाणार होते. या भाड्यामध्येच जेवण, चहा, नास्ता आदी सुविधा अंतभुर्त होत्या. मात्र, यासाठी नेमण्यात येणाऱ्या ठेकेदारांला 25 लाख रूपयाची अनामत रक्कम निर्धारीत केली होती. त्यामुळे एवढी भरमसाठ रक्कम भरून व्यवसाय होईलच याची खात्री नसल्याने कोणीही हा ठेका घेतला नाही. त्यामुळे हाऊसबोट सध्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला खाडी ठिकाणी सडत पडली असल्याचे विदारक चित्र द्सत आहे.
कोकण किनारपट्टीवरील जलपर्यटनाव्दारे नैसर्गिक सृष्टीसौंदर्य पाहण्याची नामी संधी एमटीडीसीने हाऊसबोटीव्दारे उपलब्ध करून दिली होती. मात्र, हाऊसबोट चालविण्यासाठीचा ठेका घेणाऱ्यास 25 लाखाची भरावी लागणारी अनामत आणि एमटीडीसीने ठरवलेले जलपयर्टनाचे माणसी भाडे या खर्चाचा ताळमेळ पाहता फायदेशीर व्यवसाय होईल, याची शाश्वती नसल्याने हाऊसबोट चालविण्यास कुणीही ठेकेदार पुढे आले नाही. हे पाहून तरी किमान एमटीडीसीने अनामत रक्कमेत व प्रवाशी तिकिट भाडयात काही तरी तडजोड केली असती तर एमटीडीसीचा हाऊसबोटी चालविण्याच्या उदेशाची संकल्पना सफल झाली असती. मात्र, एमटीडीसीने तडजोडीची भुमिका स्विकारली नाही आणि हाऊस बोट वापराविना सडून गेली त्यामुळे पर्यटकांना जलपर्यटनाचा आनंद घेता आला नाही, असे इस्माईल उंडरे , बाणकोट ग्राम पंचायतीचे माजी सरपंच तसेच बद्रुद्दीन ईस्माईल उंडरे , बाणकोट येथील रहिवासी आणि गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथील प्रवासी बोट चालक व्यवसायिक यांनी सांगितले.






























































