
कल्याण पश्चिमेतील घोलप नगर परिसरात दुपारच्या सुमारस पाडकाम सुरू असलेली इमारत भर रस्त्यात कोसळली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ही घटना दुपारी 2 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास घडली. रि-डेव्हलपमेंटसाठी पाडकाम सुरू असलेल्या घोलप नगरमधील विनायक दर्शन इमारतीचा मोठा भाग अचानक भर रस्त्यात कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कल्याण पश्चिमेतील घोलप नगर परिसरात रविवारी दुपारी री-डेव्हलपमेंटसाठी पाडकाम सुरू असलेल्या विनायक दर्शन इमारतीचा मोठा भाग अचानक कोसळला. इमारतीचा मोठा भाग थेट रस्त्यावर कोसळल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. इमारत कोसळतानाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इमारतीजवळ राहणाऱ्या मोरे कुटुंबाने धोका ओळखत आपल्या घरातील स्वयंपाकघराच्या खिडकीतून उडी मारून जीव वाचवला. मात्र, या दुर्घटनेत त्यांच्या घराचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पाडकामादरम्यान पुरेशा सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप केला आहे. विकासकाच्या कथित हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
ही इमारत अतिधोकादायक झाली होती. गेल्या अनेक दिवसापासून या इमारतीबाबत पाठपुरावा केला जात होता. ही इमारत एका विकासाकडे डेव्हलपमेंटसाठी देण्यात आली होती. या इमारतीमुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला होता. पावसाचं प्रमाण कमी झाल्यानंतर संबंधित बिल्डर आणि कंत्राटदाराने पाडकाम सुरू केलं. मात्र इमारत पाडताना कंत्राटदाराने कोणत्याही उपाययोजनांची खबरदारी घेतली नसल्याचं सांगितलं जात आहे.



























































