
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास चिपळूणच्या बाजारपुलावरून एका अज्ञात तरुणाने वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्रशासनाकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने पुलावरून नदीत उडी घेतल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आणि तात्काळ पोलिसांना याची वर्दी दिली. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस आणि स्थानिक रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुलावर या तरुणाच्या मालकीच्या चप्पल आणि घड्याळ सापडल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर रविवारी (12 जुलै) सकाळी कालूस्ते परिसरात आढळून आला. रिजवान बरकार (वय 25, रा. गोवळकोट, चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे.
शनिवार, 11 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास रिजवानने चिपळूण बाजार पुलावरून नदीत उडी घेतली होती. ही धक्कादायक घटना समजताच चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक रेस्क्यू टीमच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम राबवण्यात आली. पुलावर तरुणाची चप्पल आणि कपडे आढळून आले होते. रात्रभर शोधकार्य सुरू ठेवण्यात आले होते, मात्र अंधार आणि नदीच्या प्रवाहामुळे मृतदेह मिळवण्यात अडचणी येत होत्या. अखेर रविवारी, 12 जुलै रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास कालूस्ते परिसरात मृतदेह तरंगताना दिसून आला. मृतदेह सापडल्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.





























































