Gadchiroli News – एटापल्लीत पुन्हा नक्षलवादी हालचालींची चाहूल; कुंडम गावाजवळ बॅनर आणि पत्रके आढळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पुन्हा एकदा नक्षलवादी हालचालींची चाहूल लागली आहे. पिपली बुर्गी उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंडम गावाजवळ नक्षलवाद्यांचे बॅनर आणि पत्रके आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कुंडम गावाजवळ रविवारी नक्षलवादी मजकूर असलेले बॅनर आणि पत्रके आढळून आली. या पत्रकांमध्ये विविध कंपन्यांविरोधात स्थानिकांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले असून, काही विकास प्रकल्प आणि प्रस्तावित ड्रोन सर्वेक्षणालाही विरोध दर्शविण्यात आला आहे. तसेच, “जल, जंगल आणि जमीन” या मुद्द्यावर स्थानिकांना एकत्र येण्याचे आवाहन करत कंपन्यांना पाठिंबा देणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा स्वरूपाच्या धमकीचाही उल्लेख या पत्रकांमध्ये करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बॅनर आणि पत्रके ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

परिसरातील जंगल भागात सुरक्षा वाढविण्यात आली असून, नक्षलवाद्यांच्या हालचालींचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन राबविण्यात येत आहे. सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे नक्षल कारवायांना मोठा आळा बसल्याचा दावा केला जात असतानाच या घटनेमुळे पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रियतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू असून, अधिकृत चौकशीनंतरच पुढील माहिती स्पष्ट होणार आहे.