माथेरानच्या वाटेवर हजारो पर्यटकांची कोंडी, घाटात वाहनांच्या तीन किलोमीटरपर्यंत रांगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विकेंड मुडसाठी निसर्गरम्य माथेरानमध्ये आलेले हजारो पर्यटक आज एण्ट्री पॉइंटवरच अडकले. प्रवासी कर भरण्यासाठी फक्त एकच खिडकी उघडी ठेवल्याने पर्यटकांची तुफान गर्दी झाली. त्यामुळे घाट मार्गावर 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने पर्यटक अक्षरशः मेटाकुटीला आले. नगर परिषद आणि पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळेच हा फटका बसल्याचा संताप पर्यटकांनी व्यक्त केला.

तासन्तास लटकंती

एकच खिडकी खुली असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतर त्यांना कर भरणा करता आला. त्यातच वाहनतळ पूर्ण क्षमतेने भरल्याने अनेक पर्यटकांनी आपली वाहने घाटरस्त्याच्या दुतर्फा पार्क केली. त्यामुळे दस्तुरी नाका ते घाटमार्गावर सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूककोंडीमुळे अनेक पर्यटकांनी पायीच माथेरान गाठले.

माथेरानमध्ये प्रवेश करण्यासाठी 50 रुपये एवढा कर भरावा लागतो. त्यासाठी नगर परिषदने दोन तिकीट खिडक्या उभारल्या आहेत. पण शनिवार व रविवारी त्यातील एक खिडकी बंद ठेवल्याने तिकीट खिडकीवर पर्यटकांची तुफान रांग लागली. त्यामुळे नगर परिषदेच्या कारभाराचे पर्यटकांनी वाभाडे काढले.

विकेंडच्या दिवशी दस्तुरी नाका येथे किमान दोन कर आकारणी खिडक्या सुरू कराव्यात किंवा रिक्षा स्टँड परिसरात अतिरिक्त तिकीट सेवा उपलब्ध करावी, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.