सामना अग्रलेख – सोनम वांगचुक, देशाची लढाई!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनम वांगचुक यांचे प्राण वाचवायला हवेत. सगळ्यात आधी अण्णा हजारे यांचा आत्मा जिवंत असेल तर त्यांनी दिल्लीत जाऊन वांगचुक यांचे डोके मांडीवर घेऊन स्वतः उपोषणाचे हत्यार उपसायला हवे. देशातील समस्त विरोधी पक्षांनी जंतरमंतरवर ठाण मांडले पाहिजे आणि ज्या तरुणांसाठी वांगचुक यांनी प्राण पणास लावले आहेत ती तरुण पिढी कोणत्या बिळात जाऊन बसली आहे? ‘जय हिंदचे नारे देत तरुणांनी जागोजागी सरकारला जेरीस आणले पाहिजे. वांगचुक यांची लढाई ही देशाची लढाई होऊ द्या!

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला 15 दिवस झाले. जंतर मंतरच्या उघड्या मंचावर देशातील युवा पिढीच्या भवितव्यासाठी त्यांनी उपवास धरला आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचे वजन दहा किलोने घटले आहे. त्यामुळे वांगचुक यांचे समर्थक, हितचिंतक चिंतेत आहेत. वांगचुक यांचे उपोषण हे कोणत्याही राजकीय किंवा व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा व विद्यार्थ्यांवर उपकार करावेत ही त्यांची मुख्य मागणी आहे. प्रधान यांचा राजीनामा का हवा आहे? वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत (NEET) घोटाळा झाला. ‘नीट’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे सरकारची नाचक्की झाली. प्रश्नपत्रिका वारंवार फुटल्याने जनक्षोभ वाढला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला ही परीक्षाच रद्द करावी लागली. पेपर फोडणारे जे आरोपी पकडले ते सर्व भाजप परिवाराशी संबंधित असल्याचे उघड झाले. परीक्षेच्या नव्या प्रश्नपत्रिका लष्कराच्या, हवाई दलाच्या ताब्यात देऊ व सुरक्षित ठेवू अशी भूमिका सरकारने घेतली. हे तर अतिच झाले. देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले गेले. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. याला शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदार असल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा ही देशातील तरुणांची मागणी आहे. ही मागणी सरकारने झिडकारली तेव्हा सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले. उपोषणाला 15 दिवस झाले तरी सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही. या काळात मोदी चार-पाच देश फिरून आले. एक-दोन ‘पदके’ नव्याने घेऊन दिल्लीत उतरले. अयोध्येच्या राम मंदिराची लूट याच काळात समोर आली. या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचे वांगचुक यांचे उपोषण आहे. वांगचुक हा हिमालयातील एक साधा, निःस्वार्थी कार्यकर्ता आहे. तो पर्यावरण राखण्यासाठी लढा देतो. तो नवे शैक्षणिक मॉडेल घेऊन

हिमालयाच्या कुशीत

काम करतो. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अमीर खान एक भव्य चित्रपट बनवतो. पंतप्रधान मोदी त्यांच्या कार्याचा ‘मन की बात’मध्ये गौरव करतात. वांगचुक यांना ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले जाते, पण तेच वांगचुक लेह-लडाखच्या जनतेच्या हक्कासाठी सरकारला धारेवर धरतात तेव्हा वांगचुक यांचे भय सरकारला वाटू लागते. वांगचुक यांनी लडाखमधील चीनच्या घुसखोरीचा मुद्दा लावून धरला. चिनी ड्रॅगन लडाख गिळत असल्याचे जगाला ओरडून सांगितले तेव्हा मोदी सरकारने वांगचुक यांना बेकायदेशीरपणे अटक केली. त्यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात डांबले. भारत सरकारची ही नियत दळभद्री आहे. संविधानाची पायमल्ली करून एक प्रकारे हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान हे काय शिक्षण क्षेत्रातले महान व्यक्तिमत्त्व नाही. ते काही डॉ. राधाकृष्णन, मौलाना आझाद, नरसिंह राव किंवा अर्जुन सिंग यांच्याप्रमाणे शिक्षण खात्याला दिशा देणारे नेतृत्व नाही. त्यांच्या काळात अनेक विद्यापीठांत भ्रष्ट कुलगुरू नेमले व त्यांनी शैक्षणिक संस्थांचे वाटोळे केले. राष्ट्रीय परीक्षांचा आमदार-खासदारांप्रमाणे घोडे बाजार भरला. लाखो रुपये देऊन प्रश्नपत्रिका बाजारात विकत मिळू लागल्या व त्यावर आवाज उठवणाऱ्यांवर प्रधान यांनी लाखोली वाहिली. ही कसली लक्षणे म्हणायची? वांगचुक या प्रश्नी उपोषणाला बसले. त्यांना सरकारी प्रतिनिधींनी भेटून तोडगा काढता आला असता, पण मोदी सरकारला वांगचुक यांच्यासारखी भली माणसे जगूच नयेत असे वाटते. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी उपोषणाला बसत तेव्हा ब्रिटिश सरकारही गांधींचे उपोषण सुटावे यासाठी धावाधाव करीत असे. तोडगे, मध्यस्थी करून गांधींचे प्राण वाचवत होते; पण मोदी सरकारला वांगचुक यांच्याशी

बोलावे इतकेही सौजन्य

दाखवायचे नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 2011मध्ये अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जनलोकपाल विधेयकासाठी उपोषण केले होते (11 दिवस). तेव्हा मनमोहन सरकारने हजारे यांच्याशी चर्चा करण्यासाठी अनेक प्रतिनिधींना, केंद्रीय मंत्र्यांना पाठवले. अण्णांसमोर तोडगे व पर्याय ठेवले, संवाद साधला. भाजपने तेव्हा अण्णांच्या आंदोलनास ‘जनक्षोभ’, ‘जनतेचा आवाज’ म्हणून पाठिंबा दिला. आज ते सत्तेवर आहेत आणि वांगचुक यांच्या आंदोलनास ‘राजकीय कट’ म्हणून उडवून लावत आहेत. हे ढोंग आहे. वांगचुक यांचे आंदोलन राष्ट्रहिताचे आहे. मोदींना बारा वर्षांपूर्वी सत्तेत आणले ते तरुणांच्या एकजुटीने. मोदींची निवड भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून करताच तरुणांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. लोकसभेला एक वर्षाचा अवकाश होता. मात्र मोदी यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात फर्ग्युसनमधील विद्यार्थ्यांसमोर भाषण करून केली होती. मोदी यांनी अनेकदा ‘परीक्षा पे चर्चा’सारखे कार्यक्रम प्रसारित केले. आज त्याच परीक्षांचा बाजार उठला आहे व मोदी त्यावर चर्चा करायला तयार नाहीत. हिमालयाचा सुपुत्र सोनम वांगचुक मोदींच्या घरासमोर, राष्ट्रपतींच्या दारात 15 दिवसांपासून अन्नपाण्याचा त्याग करून लढतो आहे. त्यांचे शरीर खंगले आहे. श्वास अडखळतो आहे. आवाज क्षीण झाला आहे, पण मोदी निष्क्रिय, कामचुकार शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना मांडीवर घेऊन बसले आहेत. सोनम वांगचुक यांचे प्राण वाचवायला हवेत. सगळ्यात आधी अण्णा हजारे यांचा आत्मा जिवंत असेल तर त्यांनी दिल्लीत जाऊन वांगचुक यांचे डोके मांडीवर घेऊन स्वतः उपोषणाचे हत्यार उपसायला हवे. देशातील समस्त विरोधी पक्षांनी ‘जंतर मंतर’वर ठाण मांडले पाहिजे आणि ज्या तरुणांसाठी वांगचुक यांनी प्राण पणास लावले आहेत ती तरुण पिढी कोणत्या बिळात जाऊन बसली आहे? ‘जय हिंद’चे नारे देत तरुणांनी जागोजागी सरकारला जेरीस आणले पाहिजे. वांगचुक यांची लढाई ही देशाची लढाई होऊ द्या!