अणुऊर्जेचा येतोय असुर, झोपेत राहू नका…सिंधुदुर्गातील महाजन बंधूंचे गाणे व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘अणुऊर्जेचा येतोय असुर, झोपेत राहू नका… चला एकजूट होऊन सर्वांनी त्याला दाखवू कोकणी हिसका…’ मुणगे येथील राम आणि शाम बंधूंनी रचलेले आणि गायलेले गाणे सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी हे गाणे स्टेटसला ठेवून अणुऊर्जा प्रकल्पाला असलेल्या विरोधाचा आवाज बुलंद केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अणुऊर्जा प्रकल्पाबाबत स्पष्टीकरण देऊनही या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या मनात असलेली भीती तसूभरही कमी झालेली नाही. सोशल मीडियावरील अनेक ग्रुपवर याबाबत चर्चा सुरू आहे. अनेकजण एकत्र येऊन लढण्यासाठी आवाहन करत आहेत. अशा परिस्थितीत मुणगे येथील महाजन बंधूंचे गीत प्रेरक ठरत आहे. या गीताला मिळत असलेल्या प्रतिक्रियांवरून हे दिसून येत आहे.

जनजागृतीसाठी कलेचा आधार

मुणगे येथील महाजन बंधू भजन कलावंत म्हणून सुपरिचित आहेत. भगवती देवीच्या पालखी सोहळ्यात ते आपली गायन कला सादर करत असतात. मुणगे येथे औष्णिक प्रकल्पाला विरोध करण्यासाठी त्यांनी आपल्या कलेचा आधार घेतला आहे. ‘मोहमायेचा बाजार सारा, गाफील राहू नका’ असे आवाहन करत ते लोकांमध्ये जागृती करत आहेत. त्यांचे गाणे खूपच लोकप्रिय होत आहे. हे गाणे औष्णिक प्रकल्प विरोधी लढ्याला बळ देणारे ठरेल, असा विश्वास महाजन बंधूंनी व्यक्त केला आहे.