
28 वर्षांपासून डॉक्टर म्हणून वावरणाऱ्या तोतयाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. विविध राज्यात वैद्यकीय शिबिराच्या नावाखाली सीएसआर फंडाच्या नावाखाली पैसे गोळा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. धर्मेंद्र कुमार असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
धर्मेंद्र हा जुहू येथे राहत होता. त्याने स्वतःची एक संस्था उघडली होती. बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून विविध बँकेत खाती उघडली होती. त्या खात्यात कोटय़वधी रुपयांची रक्कम गोळा झाली होती. त्या पैशाचा वापर त्याने रुग्णांसाठी न करता स्वतःसाठी केला. याबाबत गुन्हे शाखेकडे एक तक्रार आली होती. त्या तक्रारीची दखल घेण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांना तपासाचे आदेश दिले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सलमान खान पठाण, पोलीस उपनिरीक्षक शेडगे, सानप, चव्हाण, पोवळकर, चव्हाण, सालके, आदीच्या पथकाने तपास सुरू केला. शनिवारी रात्री उशिरा पोलिसांच्या पथकाने धर्मेंद्र कुमार याच्या जुहू येथील मालकी हक्काच्या फ्लॅटमध्ये अचानक छापा टाकला होता. त्यात या अधिकाऱयांना विविध राज्यातील व्यक्तींचे, कंपन्यांचे नाव, प्रोजेक्ट रिपोर्ट सापडले. तसेच धर्मेंद्र पुमार नावाचे बोगस डॉक्टर असल्याचे ओळखपत्र, पॅनकार्ड, व्हिझीटिंग कार्ड, विविध संस्थांनी दिलेली प्रमाणपत्रे, औषधोपचाराचे साहित्य आदी मुद्देमाल जप्त केला आहे.





























































