आधी दोन लाखांवरील कर्ज भरा; मगच मिळेल कर्जमुक्ती! लाभार्थी निकषांच्या कात्रीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शासनाने शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला तरी प्रत्यक्ष कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षा संपलेली नाही. थकीत रक्कम असलेल्या पीक कर्जदार शेतकऱ्यांना आधी दोन लाखांवरील थकीत रकमेची परतफेड करावी लागेल. त्यानंतरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.

‘अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील कर्जखात्यांची तपासणीही जवळपास पूर्ण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुद्दल आणि व्याजासह प्रतिशेतकरी 2 लाख रुपयांपर्यंत थेट कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यात 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेल्या कर्जाचा समावेश आहे. त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ दिला जाणार आहे.

जास्त कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना (ओटीएस) आणली आहे. एक एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 अखेर अशा सहा वर्षांच्या कालावधीत व्यवहारांबाबत ‘ओटीएस’ची सुविधा असेल. या सहा वर्षांच्या कालावधीत उचल केलेल्या अल्पमुदत पीककर्जाचे किंवा याच कालावधीत वाटप केलेल्या अल्पमुदत पीककर्जाचे पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन केले असल्यास ही सवलत मिळू शकते. राज्यभर विविध बँकांमध्ये पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.